भारतीय महिला संघापुढे आज दक्षिण कोरियाचे आव्हान

विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी भारतीय महिला संघाला आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत शनिवारी साखळी गटातील शेवटच्या लढतीत दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्पर्धेतील अंतिम सामना भारत व कोरिया यांच्यातच होणार असल्यामुळे आजची लढत त्याची रंगीत तालीम असणार आहे.

सुनीता लाक्राच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत जपान (४-१), चीन (३-१), मलेशिया (३-२) यांच्याविरुद्ध शानदार विजय मिळवले आहेत. यजमान कोरियाला जागतिक क्रमवारीत नववे स्थान आहे. कोरियाने अव्वल साखळी गटात मलेशिया व चीन या दोन्ही संघांना ३-१ याच फरकाने हरवले असून जपानविरुद्ध त्यांना १-१ अशी बरोबरी स्वीकारावी लागली होती.

‘‘कोरिया हा तुल्यबळ संघ असला व त्यांना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होणार असला, तरीही या स्पर्धेत आतापर्यंत आमच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. हे लक्षात घेता आमच्या खेळाडूंमध्ये कोरियाला पराभूत करण्याची क्षमता आहे. आम्ही गतिमान खेळावर भर देणार असलो, तरी बचाव तंत्रावरही लक्ष देत आहोत. कोरियाच्या खेळाडूंचा बचाव अधिक बलाढय़ मानला जातो, हे लक्षात घेऊनच आम्ही त्या दृष्टीने योग्य नियोजनपूर्वक खेळ करणार आहोत,’’ असे भारताचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरीन यांनी सांगितले.

‘‘आमच्या खेळाडूंना कोणतेही दडपण न घेता खेळ करण्याच्या सूचना केल्या आहेत, तरीही थोडे दडपण असणार आहे. त्यामुळे चुका कशा टाळता येतील, याचे मार्गदर्शन खेळाडूंना करण्यात आले आहे. रविवारी कोरियाशी अंतिम लढत खेळायची आहे व त्या दृष्टीने ही लढत महत्त्वाची असेल. अखेरच्या साखळी सामन्यातील कामगिरीनुसार अंतिम सामन्यातील व्यूहरचना करणे सोपे जाणार आहे,’’ असे मरीन म्हणाले.