भारत दौऱ्यावर अखेर श्रीलंकेला विजयाचा सूर गवसला. धरमशालाच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकने ७ गडी राखून भारताला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह श्रीलंकेनं एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर श्रीलंकेनं भारताला ११२ धावात रोखले. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकनं २०.४ षटकात ३ बाद ११४ धावा करत विजयी सलामी दिली.

श्रीलंकेच्या डावाच्या सुरुवातीला जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने सलामी जोडी फोडत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्याने  दनुष्का गुणतिलका अवघ्या १ धावेवर बाद केले. त्यानंतर भुवनेश्वरने श्रीलंकेला दुसरा गडी बाद केला.  त्याने लाहिरू थिरिमानेला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर उपुल थरंगाने ४९ धावांच्या खेळीने भारत दौऱ्यातील पहिल्या विजयासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. थरंगा पांड्याच्या गोलंदाजीवर धवनच्या हाती झेल देवून तंबूत परतला. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज (२५) आणि निरोशान  डिक्वेला (२६) यांनी श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

महेंद्रसिंह धोनीच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने  श्रीलंकेसमोर ११३ अवघ्या धावांचे आव्हान ठेवले. सुरंगा लकमल आणि इतर श्रीलंकन गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजीला सुरुंग लावला. मॅथ्यूजने सलामीवीर शिखर धवनला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर सुरंगा लकमलने कर्णधार रोहित शर्माला अवघ्या दोन धावावर तंबूचा रस्ता दाखवला. सलामीची जोडी अपयशी ठरल्यानंतर मध्यफळीतील फलंदाजांनी देखील निराश केले. दिनेश कार्तिकने तब्बल १८ चेंडू खेळले मात्र, त्याला खाते उघडण्यातही यश आले नाही. मनीष पांडे अवघ्या दोन धावावर बाद झाला. श्रेयस अय्यरने स्थिरावण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यूवान प्रदीपने त्याला ९ धावावर बाद केले. श्रेयसने भारताच्या डावातील पहिला चौकार खेचला.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या महेंद्रसिंह धोनीनं १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं ६५ धावांची खेळी केली. त्याला हार्दिक पांड्या १० आणि कुलदीप यादव १९ धावा करत साथ दिली. अखेरच्या षटकात एकामागून एक विकेट्स पडत असल्यामुळे धोनीनं आक्रमक खेळास सुरुवात केली. अखेर थिसारा परेराच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारताने ३८.२ षटकात ११२ धावांपर्यंत मजल मारली. फिरकीपटू युजवेंद्र चहलने या सामन्यात ९ चेंडूचा सामना करत शून्यावर नाबाद राहिला.

श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने १० षटकांच्या कोट्यात ४ निर्धाव षटकासह १३ धावात ४ बळी टिपले. तर न्यूवान प्रदीपने दोन, अखिला धनंजया, परेरा,  सचिथ पथिराणा आणि मॅथ्यूज यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

अँजेलो मॅथ्यूज आणि निरोशान डिक्वेला यांनी श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. (बीसीसीआय)
  • हार्दिक पांड्याने थरंगाला ४९ धावावर बाद केले
  • सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत उपुल थरंगाने संयमी खेळी केली
  • श्रीलंकेला दुसरा धक्का
  • भारतीय गोलंदाजही फॉर्ममध्ये, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर थिरिमाने गडबडला
  • श्रीलंकेला पहिला धक्का, बुमराहाच्या गोलंदाजीवर दनुष्का गुणतिलका बाद

  • भारताचा डाव ११२ धावांवर आटोपला
  • थिसारा परेराने धोनीच्या झुंजार खेळीला ब्रेक लावला

  • धोनीनं कारकिर्दीतील ३३ वे अर्धशतक साजरे केले
  • सचिथ पथिराणानं बुमराहला शून्यावर माघारी धाडले
  • धोनीची एकाकी झुंज, भारताला नववा धक्का
  • कुलदीप यादवने २५ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने १९ धावा केल्या
  • धोनी भारतीय संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करत आहे
  • भारताला आठवा धक्का, धनंजयाने कुलदीपला धाडले माघारी
  • भुवनेश्वर कुमारला लकमलने डिक्वेलाकरवी झेलबाद केले
  • प्रदिपने श्रीलंकेला सहावे यश मिळवून दिले.
  • हार्दिक पांड्या दोन चौकाराच्या मदतीने १० धावा करुन तंबूत परतला
  • श्रेयस अय्यर सर्वाधिक नऊ धावा करुन बाद
  • मनीष पांडे अवघ्या दोन धावांची भर घालून तंबूत परतला
  • दिनेश कार्तिक १८ चेंडूत एकही धाव करु शकला नाही
  • धर्मशाला मैदानात आघाडीच्या फलंदाजांनी प्रेक्षकांची निराशा केली
छाया सौजन्य- बीसीसीआय
  • सुरंगा लकमलने दिनेश कार्तिकला पायचित केले, भारतीय संघाला तिसरा धक्का
  • श्रीलंकन गोलंदाजीसमोर आघाडी फलंदाजांनी  नांगी टाकली आहे
  • भारतीय संघाची मदार श्रेयस अय्यर आणि दिनेश कार्तिकवर
  •  भारताला दुसरा धक्का, कर्णधार रोहित शर्माही तंबूत
  • श्रेयस अय्यरला मोठी कामगिरी करण्याची संधी
  • मॅथ्यूजने श्रीलंकेला मिळवून दिले पहिले यश
  • भारतीय संघाची खराब सुरुवात, शिखर धवन शून्यावर बाद

  • सुरंगा लकमलनं पहिले षटक निर्धाव
  • कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनची सावध सुरुवात
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय