News Flash

वर्चस्वाचा डंका, आता लक्ष्य लंका!

अव्वल स्थान अबाधित राखण्याचा प्रयत्न

| July 26, 2017 03:15 am

वेळ : १० वा.पासून; प्रक्षेपण : सोनी सिक्स , सोनी-टेन ३ आणि एचडी.

आजपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ सज्ज; अव्वल स्थान अबाधित राखण्याचा प्रयत्न

भारताच्या आयसीसी कसोटी क्रमवारीतील अग्रस्थानाचा प्रवास जेथून सुरू झाला, त्याच श्रीलंकेत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. पसंतीचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या साथीने कसोटी क्रिकेटमधील वर्चस्व अबाधित राखण्याचाच प्रयत्न कर्णधार विराट कोहलीचा असणार आहे. कसोटी क्रमवारीत तळाच्या स्थानावरील झिम्बाब्वेकडून पत्करलेल्या पराभवातून सावरण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न असेल.

विराटच्या भारतीय संघाने २०१५मध्ये गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मानहानीकारक पराभव पत्करला होता. त्यावेळी १७६ धावांच्या आव्हानापुढे भारताचा डाव ११२ धावांत गडगडला होता. या दोन वर्षांच्या कालखंडात बरेच काही बदलले आहे. सुरुवातीच्या काळात युवा आणि आक्रमक संघनायक अशी ओळख जपणारा विराट आता परिपक्व झाला आहे. विराटच्या नेतृत्वाखालील १७ कसोटी सामन्यांपैकी भारताने १२ सामने जिंकले आहेत. २०१६-१७च्या हंगामात वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे विजय मिळवले आहेत. हाच विजयी आत्मविश्वास घेऊन भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे.

रवी शास्त्री यांचे भारतीय संघासोबत पुनरागमन हे या दौऱ्याचे वैशिष्टय़ ठरेल. संघ श्रीलंकेत दाखल होऊन पाच दिवस झाले आहे. अनिल कुंबळे यांचे राजीनामानाटय़ आता इतिहासजमा झाले आहे. शास्त्रीसोबत त्याचा विश्वासू गोलंदाजीचा मार्गदर्शक भरत अरुण सोबत आहे. संघरचनेबाबत दोघेही सकारात्मकतेने पाहात आहेत. ज्यावेळी शास्त्री भारताचे संघ संचालक होते, गॉलच्या पराभवानिशीच मालिकेला प्रारंभ झाला होता. मात्र ०-१ अशा खराब सुरुवातीनंतर भारताने ती मालिका २-१ अशी जिंकली होती. त्यावेळी युवा भारतीय संघाने भारताबाहेर प्रथमच विजयाची चव चाखली होती. नंतर हीच विजयी घोडदौड पुढील दोन वर्षांत कायम राहिली होती.

गॉलच्या पराभवानंतर २०१५-१६ आणि २०१६-१७ या हंगामांमध्ये भारतीय संघ २३ कसोटी सामने खेळला, यापैकी ऑस्ट्रेलियाविरुद्धची पुणे येथे झालेली कसोटी फक्त भारताने गमावली होती. भारताची फलंदाजीची फळी सक्षम अशी आहे. आघाडीपासून तळापर्यंत डाव सावरू शकणारे फलंदाज संघात आहेत. त्यामुळेच तापामुळे लोकेश राहुल पहिल्या कसोटीला मुकणार असला तरी चिंतेचे कोणतेच कारण नाही. त्यामुळे राहुलचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन मात्र लांबले आहे. शिखर धवन आणि अभिनव मुकुंद भारताच्या डावाला प्रारंभ करतील. मुकुंदला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बेंगळुरु कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्याने दोन डावांत मिळून १६ धावा केल्या होत्या.

सलामीच्या जोडीनंतर चेतेश्वर पुजारा, कोहली आणि अजिंक्य रहाणे या मधल्या फळीवर भारताची मदार असेल. याच मैदानावर दोन वर्षांपूर्वी भारताने पाच गोलंदाजी खेळवण्याची चूक केली होती. चौथ्या डावात रंगना हेराथच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली होती. यावेळी तशाच प्रकारची संघरचना कोहली करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रोहित शर्माचे पुनरागमन होऊ शकेल, अशी अपेक्षा करता येईल. गेल्या वर्षी इंदूर येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो अखेरचा खेळला होता.

ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या कसोटीमधील हा ५०वा सामना आहे. जर कोहली पाच गोलंदाजांसह खेळला, तर अतिरिक्त फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला संधी मिळणे स्वाभाविक आहे. वेगवान गोलंदाजांच्या दोन स्थांनासाठी मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना प्राधान्याने संधी मिळू शकते. त्यामुळे इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती मिळेल.

दुसरीकडे श्रीलंकेचा संघ खडतर अशा संक्रमणाच्या कालखंडातून जात आहे. ग्रॅहम फोर्ड यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला असल्याने निक पोथास यांच्याकडे मार्गदर्शनाची प्रभारी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चामिंडा वास आणि हसन तिलकरत्ने अनुक्रमे गोलंदाजी आणि फलंदाजीचे सल्लागार म्हणून संघासोबत असतील.

दरम्यान, नवा कसोटी कर्णधार दिनेश चंडिमल न्युमोनियामुळे पहिल्या कसोटीसाठी अनुपलब्ध असेल. त्याच्या अनुपस्थितीत रंगना हेराथकडे नेतृत्व देण्यात आले आहे, जेणेकरून अँजेलो मॅथ्यूज आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित करू शकेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या कसेाटी सामन्यात डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने ११ बळी घेतले होते. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यातही हेच अस्त्र वापरले जाणार आहे. मलिंदा पुष्पकुमारावर डावखुऱ्या फिरकीची धुरा असेल. ३० वर्षीय मलिंदा कसोटी पदार्पणासाठी उत्सुक आहे. ९९ प्रथम श्रेणी सामन्यांत त्याच्या खात्यावर ५५८ बळी जमा आहेत. वेगवान गोलंदाज न्यूवान प्रदीपच्या पुनरागमनामुळे श्रीलंकेची ताकद वाढली आहे. चंडिमलच्या  जागी धनंजय डी’सिल्व्हाला संघात स्थान देण्यात आले आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद.

श्रीलंका : रंगना हेराथ (कर्णधार), उपुल तरंगा, दिमुत करुणारत्ने, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, असीला गुणरत्ने, निरोशान डिक्वेला, धनंजय डी’सिल्व्हा, दनुष्का गुणतिलका, दिलरुवान परेरा, सुरंगा लकमल, लाहिरु कुमारा, विश्वा फर्नाडो, मलिंदा पुष्पाकुमारा, नुवान प्रदीप.

पंडय़ाला पदार्पणाची संधी -कोहली

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडय़ाला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते, असे संकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत. याबाबत कोहली म्हणाला, ‘‘२०१५मधील सामन्यात फलंदाज अपयशी ठरले होते आणि पाचव्या गोलंदाजाचा प्रयोग अनुपयुक्त ठरला होता. त्यामुळे हमखास बळी घेणाऱ्या हार्दिक पंडय़ाला संघात स्थान देऊ शकतो.’’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2017 3:15 am

Web Title: india vs sri lanka 1st test day 1
टॅग : India Vs Sri Lanka
Next Stories
1 उमेश यादव हा गुणवान गोलंदाज
2 समान आदर, आर्थिक लाभ हवा!
3 तंदुरुस्ती आणि दुसरी फळी हीच यशाची गुरुकिल्ली
Just Now!
X