श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज; अजिंक्यला संधी मिळण्याची शक्यता; वेगवान गोलंदाजांसाठी पोषक वातावरण

तिसऱ्या कसोटी सामन्याचा तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला, तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात झालेला लाजिरवाणा पराभव. या दोन्ही गोष्टींमुळे भारताचे मनोबल खचलेले असेल. पण हा सामना जर त्यांनी गमावला तर त्यांच्या हातून मालिका निसटू शकते. त्यामुळे बुधवारी असलेला श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतासाठी महत्त्वाचा असेल. कारण मालिका वाचवण्याची त्यांच्यासाठी ही अखेरची संधी असेल. दुसरीकडे पहिला एकदिवसीय सामना जिंकत श्रीलंकेचा संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आघाडीवर आहे. दुसरीकडे, दुसरा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी श्रीलंकेचा संघ प्रयत्नशील असेल.

धरमशाला येथील पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा अपवाद वगळता साऱ्याच्या फलंदाजांची त्रेधा उडाली होती. भारतीय खेळाडू स्विंग गोलंदाजीसमोर अजूनही हतबल होतात, हे या सामन्याने दाखवून दिले. पण पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आय. एस. बिंद्रा स्टेडियमवर धरमशालासारखेच वातावरण असणार आहे. थंडीच्या मोसमात मोहालीमध्ये होणारा सामना वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरतो. चेंडूला वेग आणि स्विंग चांगला मिळतो. त्यामुळे भारताच्या फलंदाजांपुढे धावा उभारण्याचे मोठे आव्हान असेल. पहिल्या सामन्यातील फलंदाजांची कामगिरी पाहता तंत्रशुद्ध फलंदाज अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अजिंक्य सध्या चांगल्या फॉर्मात नसला तरी त्याच्या तंत्रावर विश्वास ठेवून त्याला खेळण्याची संधी मिळू शकते. पण अन्य फलंदाजांनी मात्र आपले तंत्र अधिक घोटवणे संघासाठी उपयुक्त ठरेल. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार ही जोडगोळी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. धरमशालामध्ये त्यांना दैवाने साथ दिली नव्हती. खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला पोषक असेल तर कर्णधाराने किती फिरकीपटूंना संधी द्यावी, याचा विचार नक्कीच करायला हवा.

श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज सुरंगा लमकलने गेल्या सामन्यात चार बळी मिळवत भारताचे कंबरडे मोडले होते. त्याला अन्य गोलंदाजांचीही चांगली साथ मिळाली होती. श्रीलंकेच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समन्वय पाहायला मिळत आहे. त्याचा फायदा त्यांना पहिल्या सामन्यात झाला होता. गेल्या सामन्यात उपुल थरंगाचे अर्धशतक एका धावेने हुकले होते. थरंगा आणि अँजेलो मॅथ्यूज या दोघांकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.

नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा

थंडी आणि दूपर्यंत पसरलेले धुके हे वेगवान गोलंदाजीसाठी पोषक वातावरण. त्यामुळे या सामन्यातही नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. कारण जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करेल. धरमशाला येथील सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताची ससेहोलपट झाली. पण जर भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले असते तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.

खेळपट्टी आणि वातावरण

या खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळू शकेल, त्याचबरोबर चेंडू चांगला स्विंगही होईल. त्यामुळे वेगवान गोलंदाजांची कामगिरी संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. सामन्याच्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यापूर्वी किंवा दरम्यान पाऊस पडला तर फलंदाजांचा या वेळी कस लागेल.

  • नोव्हेंबर १९९३ पासून या मैदानात आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करायला सुरुवात झाली. त्यानंतर आतापर्यंत भारतातील सर्वाधिक २३ सामने या मैदानात खेळवले गेले आहेत.
  • तब्बल ११ वर्षांनंतर श्रीलंकेचा सलामीवीर उपुल थरंगा या मैदानात खेळणार आहे. २००६ साली झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात थरंगाने १०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर थरंगा आतापर्यंत या मैदानात एकही सामना खेळलेला नाही.
  • या सामन्यात श्रीलंकेच्या दोन फलंदाजांना हजारी मनसबदार होण्याची संधी आहे. अँजेलो मॅथ्यूजला पाच हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी ६३ धावांची गरज आहे, तर निरोशन डिकवेलाला हजार धावा पूर्ण करण्यासाठी २१ धावांची आवश्यकता आहे.
  • या मैदानात गेल्या वेळी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामना झाला होता. या लढतीत तेरापैकी आठ बळी वेगवान गोलंदाजांनी मिळवले होते. भारताने हा सामना सहज जिंकला होता.

मालिका विजयासाठी आम्हाला ही सुवर्णसंधी आहे. भारतामध्ये बलाढय़ संघांना आतापर्यंत मालिका जिंकता आलेली नाही. पण हा सामना जिंकून आम्ही मालिका खिशात टाकू शकतो. धरमशालेतील कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास आम्हाला मालिका विजय दूर नाही.

थिसारा परेरा, श्रीलंकेचा कर्णधार.

भारतीय संघ माझ्यासाठी नवखा नक्कीच नाही, कारण यापूर्वी आयपीएलमध्ये भारताच्या संघातील काही खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मला मिळाली आहे. आयपीएलमध्ये माझ्या संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीने केले होते. त्यामुळे पहिल्यांदाच भारतीय संघात दाखल झालो असलो तरी माझ्यासाठी हे खेळाडू नवीन नाहीत.

वॉशिंग्टन सुंदर, भारताचा अष्टपैलू.

संघ

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, वॉशिंग्टन सुंदर.
  • श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, दनुष्का गुणतिलका, लाहिरू थिरिमाने, अँजेलो मॅथ्यूज, असिला गुणरत्ने, निरोशान डिक्वेला (यष्टीरक्षक), चतुरंगा डी’सिल्व्हा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, न्यूवान प्रदीप, सदिरा समरविक्रमा, धनंजया डी’सिल्व्हा, दुष्मंता चामिरा, सचिथ पथिराणा, कुशल परेरा.

सामन्याची वेळ : सकाळी ११.३० वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.