दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासह मालिका जिंकण्याचा भारताचा निर्धार

श्रीलंकेची भारत दौऱ्यावरील वणवण संपली नसल्याचेच प्रत्ययास येत असून, बुधवारी कटकला झालेल्या सलामीच्या ट्वेन्टी-२० सामन्यात यजमान संघाने ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. आता आपल्या वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर शुक्रवारी होणारा श्रीलंकेविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेवर कब्जा करण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे.

श्रीलंकेचा संघ संक्रमणाच्या अवस्थेतून जात असून, मैदानावर विश्वासार्ह कामगिरी दाखवण्यात ते सातत्याने अपयशी ठरत आहेत. दुसरीकडे भारतीय युवा संघ आत्मविश्वासाने दिमाखदार कामगिरी बजावत आहेत. प्रतिकाराचा अभाव आणि एकतर्फी लढती यामुळे बलाढय़ भारतीय संघ विरुद्ध दुबळा श्रीलंकेचा संघ अशाच प्रकारच्या लढती क्रिकेटरसिकांना पाहायला मिळत आहेत. या मालिकेत भारतीय संघ आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी गांभीर्याने तयारी करीत असल्याचे दिसून येत नाही.

श्रीलंकेच्या गोलंदाजांवर भारतीय फलंदाज लीलया वर्चस्व गाजवून धावा काढत आहेत. नियमित संघनायक विराट कोहली, धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन आणि भरवशाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितीतही भारताच्या कामगिरीत कोणताही फरक जाणवत नाही. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीने पहिल्या सामन्यात कमाल केली.

श्रीलंकेच्या संघाची अँजेलो मॅथ्यूजसारख्या काही अनुभवी खेळाडूंवर मदार आहे. मात्र कर्णधार थिसारा परेरा, उपूल थरंगा आणि मॅथ्यूज हे आपल्या कामगिरीद्वारे संघाची कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरत आहेत; परंतु दुष्मंता चामीरा आणि धनंजया डी’सिल्व्हा यांची कामगिरी मात्र लक्षवेधी होत आहे.

काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीबाबत टीकाकारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अप्रतिम खेळी साकारली. कोहलीच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळालेल्या श्रेयस अय्यरने कटकला २४ धावा केल्या. लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी साकारून संघाच्या मोठय़ा धावसंख्येच्या दृष्टीने पाया रचला.

  • वेळ : सायंकाळी ७ वा.पासून; थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर