भारत आणि श्रीलंका यांच्यात गॅले येथे सुरू असणाऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने ८७ धावांची आघाडी मिळाली आहे. उपहारानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे उपहारापूर्वी ३ बाद २२४ असा सुस्थितीत असणारा लंकेचा डाव ३०६ धावांवर आटोपला. कर्णधार अँजलो मॅथ्यूज आणि लहिरू थिरिमान्नेची भागीदारी आजच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. हे दोघे बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा एकही फलंदाजी खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. तर भारताकडून अमित मिश्राने प्रभावी गोलंदाजी करत श्रीलंकेच्या तळाच्या फलंदाजांना झटपट बाद केले. त्याने या डावात एकूण चार बळी मिळवले. ईशांत शर्मा आणि स्टुअर्ट बिन्नी यांनीदेखील महत्त्वपूर्ण बळी मिळवत त्याला योग्य साथ दिली. या दोघांनी अनुक्रमे लंकेच्या दोन आणि एका फलंदाजांना माघारी धाडले.
दरम्यान, लंकेने कालच्या ३ बाद १४० या धावसंख्येवरून आज डावाची सुरूवात केली. त्यानंतर श्रीलंकन फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. उपहारापर्यंत भारतीय गोलंदाजांना बळी मिळवण्यासाठी चांगलेच झगडावे लागले. मात्र, त्यानंतर ईशांत शर्माने अँजलो मॅथ्यूज आणि थिरीमान्नेची जोडी फोडली. तर स्टुअर्ट बिन्नीने मॅथ्यूजचा अडथळा दूर केला. अँजलो मॅथ्यूज आणि लहिरू थिरिमान्ने यांनी अनुक्रमे १०२ आणि ६२ धावा झळकावल्या. ही जोडी तंबूत परतल्यानंतर अमित मिश्राने धम्मिका प्रसादला बाद केले. दरम्यान, ईशांत शर्माने दिनेश चंदिमललाही खेळपट्टीवर स्थिरावण्याची संधी दिली नाही. तो ११ धावा करून माघारी परतला.