नागपुरात आजपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजांची अग्निपरीक्षा 

कोलकाता कसोटीतील पहिल्या डावात श्रीलंकेने भारताला अनपेक्षित धक्के दिले. मात्र दुसऱ्या डावात भारताने पुनरागमन करून वर्चस्व सिद्ध करत पारडे आपल्या बाजूने झुकवले. वेळेअभावी सामना अनिर्णित ठरला, परंतु कोणत्याही परिस्थितीतून सामन्यात पुनरागमन करण्याची क्षमता मात्र भारतीय फलंदाजांनी कोलकाता कसोटीत दाखवून दिली. त्यामुळे पहिल्या कसोटीतून आत्मविश्वास उंचावणारा भारतीय संघ नागपुरातही धावांचा डोंगर उभारून आपले पारडे जड असल्याचे सिद्ध करू शकतो.

नागपूरच्या जामठा स्टेडियमवर श्रीलंका-भारत पुन्हा एकदा समोरासमोर राहणार आहेत. मात्र ही लढत दोघांसाठी निर्णायक आणि महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयी ध्येय ठेवूनच मदानात उतरणार हे नक्की. कोलकाता कसोटीत खेळपट्टीमुळे भारताचा पहिला डाव झटपट गुंडळण्यास श्रीलंकेला मोठे यश आले. सुरंगा लकमलने भारताची आघाडीची फळी तंबूत परतवून वर्चस्व गाजवले, तर दुसऱ्या दिवशीही भारताची पडझड सुरूच होती. अशात भारताच्या चेतेश्वर पुजाराने डाव सांभाळला. दुसऱ्या डावात चेतेश्वरचा आदर्श घेऊन भारताच्या फलंदाजांनी बऱ्यापकी खेळी साकारली.

केवळ गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या हिरव्यागार खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी पराभव टाळला आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली, परंतु वेळेअभावी सामना अनिर्णित ठरला. दुसऱ्या कसोटीतही कोलकातासारखीच खेळपट्टी नागपूरची आहे, परंतु पहिल्या कसोटीत प्रभाव दाखवणारे भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन दुसऱ्या कसोटी संघात नाहीत. त्यांच्या जागी अष्टपलू विजय शंकरला स्थान मिळाले आहे. त्यामुळे आपली प्रतिभा दाखवण्यासाठी त्याला संधी आहे. तसेच या मैदानावर अनेक रणजी सामने गाजवणारा उमेश यादव ही भारतासाठी जमेची बाजू आहे. अनुभवी इशांत शर्मा, मोहम्मद शमी, यादव या वेगवान गोलंदाजांची तर विराट कोहली, अजिंक्य रहाणेसह चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, वृद्धिमान साहा यांच्यावर भारताची मदार आहे.

श्रीलंकेविरुद्धची मालिका आटोपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा महत्त्वपूर्ण दौरा करणार आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाला बलाढय़ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्याची पूर्वतयारी करण्याची संधी मिळाली आहे. विदेशातील खेळपट्टय़ा वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या आणि फलंदाजांची परीक्षा घेणाऱ्या असतात. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धचे सामने हिरव्यागार खेळपट्टीवर घेण्याची मागणी भारतीय संघ व्यवस्थापनाने केली व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ती मान्य केली. खेळपट्टीचे एकूण स्वरूप लक्षात घेता त्यावर गवत असून ती वेगवान गोलंदाजांना अधिक साहाय्य करील. त्यामुळे धावा करण्यासाठी फलंदाजांना मेहनतच घ्यावी लागेल.

फलंदाजीत विराट फॉर्मात आहेच, तर श्रीलंकेचा विचार केल्यास सुरंगा लकमल, लहिरू गमागे आणि निरोशान डिक्वेला भारताला घातक ठरू शकतात. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजची मागील वर्षांत विशेष कामगिरी दिसून आली नाही.

उमेशला नागपुरात संधी मिळणार का?

भारतीय संघात विदर्भातील मध्यमगती गोलंदाज उमेश यादवने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. उमेशने आतापर्यंत ३५ कसोटी, ७१ एकदिवसीय आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, परंतु अजूनही नागपूर येथील घरच्या मदानावर उमेशला खेळण्याची संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यातील बंगळुरू येथील चौथ्या लढतीत उमेशने चार बळी बाद केले होते. मात्र नागपूर येथे १ ऑक्टोबरला झालेल्या पाचव्या सामन्यात त्याला मुख्य संघात स्थान मिळाले नाही. श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना नागपुरात होत असून उमेश यादवचा भारतीय संघात समावेश आहे. कोलकाता येथील पहिल्या कसोटी सामन्यात तीन बळी घेणाऱ्या उमेशला नागपुरात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळणार का, याबद्दल सर्वाना उत्सुकता आहे.

जामठय़ात अर्धशतक

भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान येत्या शुक्रवारपासून जामठा स्टेडियमवर सुरू होत असलेला दुसरा कसोटी सामना महत्त्वपूर्ण असला तरी, विदर्भ क्रिकेट संघटनेसाठीही या सामन्याचे आगळेवेगळे महत्त्व राहणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने नागपुरात आंतरराष्ट्रीय सामन्यांचे अर्धशतक पूर्ण होणार आहे. १९५६मध्ये विदर्भ क्रिकेट संघटनेची स्थापना झाल्यापासून नागपुरात (सिव्हिल लाइन्स आणि जामठा) १४ कसोटी, २२ एकदिवसीय लढती आणि १३ टी-२० सामने असे एकूण ४९ सामने खेळले गेले. १९६९ मधील भारत-न्यूझीलंड कसोटीने नागपुरात आंतरराष्ट्रीय सामन्यांना सुरुवात झाली होती. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणारा सामना ५०वी लढत राहील.

आम्ही चमत्कार घडवू शकतो -चंडिमल

नागपूर : मायदेशात भारताची ताकद जास्त असली तरी आम्हीदेखील या दौऱ्याकडे विजयाच्या दृष्टिकोनातून बघतो. आमच्या संघातील गोलंदाज व फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यास आम्ही या दौऱ्यात चमत्कार घडवू शकतो, अशा शब्दांत श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमलने भारताला इशारा दिला आहे.

‘‘आम्ही भारतात विजयाच्या हेतूने आलो आहोत. भारताला त्यांच्या भूमीत पराभूत करणे सोपे नाही. त्यामुळे आमच्यासमोर भारत निश्चितच मोठे आव्हान असणार आहे. कोलकाता येथील पहिल्या डावात आमच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे नागपूर कसोटीत सर्व विभागांत आमची कामगिरी जुळून आली, तर या सामन्यात आम्ही भारताला पराभूत करू शकतो,’’ असे चंडिमलने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘आमच्या खेळाडूंमध्ये तशी क्षमतादेखील आहे. ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीवर मी समाधानी आहे.’’