श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि अमित मिश्रा यांनी शतकी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. भारतीय संघ ७ बाद १८० अशा बिकट अवस्थेत सापडला असताना या दोघांनी संयमी फलंदाजी करत संघाची धावसंख्या ३०० च्या जवळपास नेऊन ठेवली. सध्या पावसामुळे खेळ थांबला असून त्यावेळी भारताची धावसंख्या ८ बाद २९२ इतकी होती. पुजाराने २१४ चेंडूत नऊ चौकारांच्या सहाय्याने कसोटी कारकीर्दीतील सातवे शतक झळकावले, तर अमित मिश्राने पुजाराला योग्य साथ देत ८७ चेंडुंमध्ये सात चौकारांसह ५९ धावा केल्या. मात्र, त्यानंतर हेराथच्या गोलंदाजीवर परेराने त्याला यष्टीचित केले. परंतु, पुजारा अजूनही खेळपट्टीवर पाय रोवून उभा असून आता तो दीडशतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
तत्पूर्वी सकाळ आणि उपहारानंतरच्या सत्रात श्रीलंकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा निम्मा संघ अवघ्या सव्वाशे धावांच्या आत तंबूत परतला. धम्मिका प्रसादने लंकेतर्फे सर्वाधिक चार बळी मिळवत भारताच्या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडले. कालच्या २ बाद ५० या धावसंख्येवरून शनिवारी डावाची सुरूवात करणाऱ्या भारतीय संघाला लगेचच कर्णधार विराट कोहली बाद झाल्यामुळे धक्का बसला. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी सुरूवातीची काही षटके सावध फलंदाजी केली. पण, कर्णधार मॅथ्यूजने विराट कोहलीला १८ धावांवर असताना यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या रोहित शर्माने पुजाराला चांगली साथ देत ५५ धावांची भागीदारी नोंदविली. दरम्यान, पुजाराने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, उपहारापूर्वी धम्मिका प्रसादने रोहितला २६ धावांवर बाद करत भारताला चौथा धक्का दिला. त्यानंतर खेळपट्टीवर आलेला स्टुअर्ट बिन्नी भोपळाही न फोडता तंबूत परतला. लंकेच्या धम्मिका प्रसादने त्याला पायचीत केले. सध्या चेतेश्वर पुजारा आणि अमित मिश्रा खेळपट्टीवर ठाण मांडून आहेत.