भारताविरुद्धचा चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना आज

निवड समिती अध्यक्ष सनथ जयसूर्या यांनी दिलेला राजीनामा.. दुखापतग्रस्त दिनेश चंडिमल. उपुल थरंगावर आलेले निलंबन. आणि हा सामना गमावल्यास विश्वचषकासाठी थेट प्रवेशाची हुकणारी संधी. या साऱ्या आपत्तीमध्ये श्रीलंकेचा क्रिकेट संघ अडकला आहे. त्यामुळे भारताविरुद्धचा चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकून या आपत्तींचे निवारण करण्यासाठी श्रीलंकेचा संघ प्रयत्नशील असेल. भारताने या मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकत विजयी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे हा चौथा सामना जिंकत भारतीय संघ विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सज्ज असेल.

चौथ्या सामन्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चार सामन्यांमध्ये श्रीलंकेचा हा तिसरा कर्णधार असेल. त्यामुळे मलिंगाच्या कर्णधारपदासाठी तरी श्रीलंकेला विजयाचा सूर गवसेल का, याची प्रतीक्षा क्रिकेट विश्वाला असेल. सध्याच्या घडीला श्रीलंकेच्या संघाचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे. त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. मलिंगाकडे आंतरराष्ट्रीय स्तराचा दांडगा अनुभव असून तो संघाची मानसिकता बदलू शकतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. श्रीलंकेला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्यांचा एखादा फलंदाज किंवा गोलंदाज संघाला सुस्थितीत आणत असला तरी अन्य टोकाकडून त्याला अपेक्षित साथ मिळताना दिसत नाही. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंना यावेळी संयम बाळगून परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हा त्रिशतकी एकदिवसीय क्रिकेट सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना धोनी कशा पद्धतीने अविस्मरणीय करतो, याची उत्सुकता क्रिकेट जगताला असेल. भारताचा संघ दमदार फॉर्मात आहे. जसप्रीत बुमराहसारखा युवा वेगवान गोलंदाज सातत्याने भेदक मारा करत आहे. भारताचे फिरकीपटूही अचूक गोलंदाजी करत आहेत. फलंदाजीमध्ये रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात आला आहे. गेल्या सामन्यात शतक झळकावत त्याने ते दाखवूनही दिले आहे.

भारताकडून तिनशेवा एकदिवसीय सामना खेळणारा धोनी सहावा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर (४६३), राहुल द्रविड (३४४), मोहम्मद अझरुद्दिन (३३४), सौरव गांगुली (३११) आणि युवराज सिंग (३०१) यांनी भारतासाठी तिनशेपेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत.

श्रीलंकेच्या निवड समिती सदस्यांचा राजीनामा

भारताविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर श्रीलंकेच्या निवड समिती सदस्यांनी आपले राजीनामे बुधवारी क्रीडामंत्री दयासीरी जयासेकरा यांना सादर केले. ‘‘श्रीलंका क्रिकेट निवड समितीचे प्रमुख सनथ जयसूर्यासह सदस्य रंजीथ मदुरासिंघे, रोमेश कालुवितरणा, असांका गुरुसिन्हा आणि एरिक उपाशांथा यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे,’’ अशी माहिती क्रीडामंत्र्यांनी दिली. या समितीचा करार ७ सप्टेंबरला संपुष्टात येणार होता.

विश्वचषकाचा थेट प्रवेश अडचणीत

इंग्लंडमध्ये २०१९ साली होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्यासाठी श्रीलंकेला आयसीसी क्रमवारीत ९० गुणांची गरज आहे. जर भारताविरुद्धच्या पाच एकदविसीय सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने दोन लढती जिंकल्या तर त्यांचे ९० गुण होऊ शकतात. विश्वचषकासाठी यजमान इंग्लंडसह सात देशांना थेट प्रवेश देण्यात येऊ शकतो. त्यामुळे सातव्या स्थानासाठी श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये चुरस असेल. वेस्ट इंडिज इंग्लंड आणि आर्यलड यांच्याविरुद्ध एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळे ते ८८ गुणांपर्यंत पोहोचू शकतात, असे समजले जात आहे. पण श्रीलंकेने भारताविरुद्ध फक्त एकच लढत जिंकली तर श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांचे समान ८८ गुण होऊ शकतात. त्यावेळी कदाचित वेस्ट इंडिजला थेट पात्र होण्याची अधिक संधी असेल. त्यामुळे श्रीलंकेला सध्यातरी दोन विजयांसह ९० गुण मिळवल्याशिवाय गत्यंतर दिसत नाही.