श्रीलंकेविरुद्धचा पाचवा एकदिवसीय क्रिकेट सामना आज

भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेमध्ये त्यांनी पराभवाचे तोंड पाहिलेले नाही. एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील चारही सामन्यांमध्ये भारताने सफाईदार विजय मिळवला आहे. आता रविवारी होणाऱ्या अखेरच्या एकदिवसीय लढतीत विजयाचा ‘पंच’ मारण्यासाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे. दुसरीकडे श्रीलंकेला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. इंग्लंडमधल्या विश्वचषकासाठीचा थेट प्रवेश त्यांनी गमावला आहे. आता अखेरचा एकदिवसीय सामना जिंकून लाज वाचवण्यासाठी त्यांच्यासाठी ही अखेरची संधी असेल.

चौथ्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची फलंदाजी नजरेचे पारणे फेडणारी होती. रोहितला चांगला सूर गवसला असून तो सातत्याने धावा करत आहे. कोहलीनेही गेल्या सामन्यात आपण फॉर्मात असल्याचे दाखवून दिले आहे. पण  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या मधल्या फळीला अजूनही सूर गवसलेला नाही. मधल्या फळीतील एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे, केदार जाधव यांना अजूनही लय सापडलेली नाही. पण महेंद्रसिंग धोनी तळाच्या फलंदाजांसहित संघाला धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलत आहे. विश्वचषकाच्या तयारीसाठी संघात काही बदल केले जात असले तरी ते पथ्यावर पडताना दिसत नाहीत. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह सातत्याने भेदक मारा करत आहे. गेल्या सामन्यात त्याला शार्दूल ठाकूरने चांगली साथ दिली होती. भारताचे फिरकीपटूही चांगली कामगिरी बजावत आहेत.

श्रीलंकेच्या संघातील एकाही खेळाडूला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. लसित मलिंगाकडे दांडगा अनुभव आहे. त्याच्याकडे संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. पण तरीही श्रीलंकेला विजयाचा मार्ग काही सापडलेली दिसत नाही. अँजेलो मॅथ्यूज धावा करत असला तरी त्याला संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले आहे. त्याच्या फलंदाजीतील कच्चे दुवे अजूनही सुधारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भारतीय फलंदाजांचा समर्थपणे सामना करत मोठी खेळी साकारण्यात तो अपयशी ठरताना दिसत आहे. निरोशन डिक्वेला काही सामन्यांमध्ये चमकला असला तरी त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गोलंदाजीमध्येही अजूनही कुणाला छाप पाडता आलेली नाही. फिरकीपटू अकिला धनंजयाने एका सामन्यात सहा बळी मिळवण्याची किमया साकारली होती, पण त्यानंतर मात्र त्याची गोलंदाजीही बोथट झाल्याचे पाहायला मिळाले. या साऱ्या पराभवानंतर श्रीलंकेच्या संघाचे मानसिक खच्चीकरण झाले असेल. पण जर विजयाच्या इर्षेने या सामन्यात ते पेटून उठले नाहीत तर त्यांची बिकट अवस्था होऊ शकते.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर.
  • श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), धनंजया डिसिल्व्हा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशान डिक्वेला, लहिरू थिरीमाने, कुशल मेंडिस, मिलिंदा सिरिवंर्धना, दनुष्का गुणतिलका, चमारा कपुगेद्रा, मलिंदा पुष्पकुमारा, अकिला धनंजया, लक्षण संदाकान, थिसारा परेरा, वनिंडू हसरंगा, दुष्मंत चमीरा, विश्वा फर्नाडो, उपुल थरंगा.

आजचा सामना : भारत वि. श्रीलंका  

वेळ : दुपारी २.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३ आणि सोनी टेन ३ एचडी.