श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या अखेरच्या सामन्यासाठी भारतीय संघापुढे पेच

भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका

पुणे : भारतीय संघ प्रत्येक सामन्यागणिक कामगिरीत सुधारणा करीत आहे, असे इंदूरच्या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने आत्मविश्वासाने सांगितले. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवावा की, संजू सॅमसन आणि मनीष पांडे यांना संधी द्यावी? हाच पेच शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात खेळताना भारतीय संघासमोर असेल.

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात अननुभवी श्रीलंकेचा भारताच्या सामर्थ्यांपुढे निभाव लागला नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात पांडे आणि सॅमसनला आजमावण्याची शक्यता आहे. श्रीलंकेसह गेल्या तीन मालिकांमध्ये पांडेला फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. सॅमसनने नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपासून भारतीय संघात स्थान मिळवले. परंतु त्याच्या वाटय़ाला अद्याप एकही सामना आलेला नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ निश्चित करण्यासाठी प्रयोग केले जात आहे. परंतु या दोन खेळाडूंना मात्र संघात स्थान देऊनही आजमावलेले नाही.

मॅथ्यूजच्या समावेशाची शक्यता

भारतीय संघाला अडचणीत आणण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे, याची जाणीव श्रीलंका संघाला इंदूरच्या पराभवाने झाली आहे. कुशल परेरा वगळता अन्य फलंदाजांकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. अष्टपैलू इसुरू उडानाची माघार हा श्रीलंका संघाला धक्का मानला जात आहे. सरावात दुखापत झाल्यामुळे श्रीलंकेचा कर्णधार आणि प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगाने इंदूरच्या सामन्यात गोलंदाजीच केली नव्हती. १६ महिन्यांनंतर ट्वेन्टी-२० सामन्यात  पुनरागमन करणाऱ्या अँजेलो मॅथ्यूजला सलग दुसऱ्या सामन्यात संघात स्थान देण्यात आले नव्हते. परंतु शुक्रवारी त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

वेगवान त्रिकुटावर गोलंदाजीची मदार

अनुभवी वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी यांनी मिळालेल्या संधीचे सोने करताना दुसऱ्या सामन्यात एकूण पाच बळी घेतले होते. ठाकूरने अखेरच्या षटकांत टिच्चून गोलंदाजी केली, तर सैनीने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वेग आणि उसळणाऱ्या चेंडूंचा अचूक मारा केला. दुखापतग्रस्त हार्दिक पंडय़ाच्या जागी खेळणारा शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनीही पुरेशा प्रमाणात मिळालेल्या संधीतून आपल्या क्षमतेचे प्रदर्शन केले. इंदूरच्या पुनरागमनाच्या सामन्यात जसप्रित बुमरा यशस्वी ठरला नाही. परंतु अखेरच्या सामन्यात तो भेदक गोलंदाजीचे दर्शन घडवेल, अशी आशा आहे. श्रीलंकेच्या संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या अधिक असल्यामुळे कुलदीप यादव आणि सुंदर यांना संघात कायम ठेवण्यात येईल.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमरा, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन.

श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), दनुष्का गुणतिलका, अविष्का फर्नाडो, अँजेलो मॅथ्यूज, दसून शनाका, कुशल परेरा, निरोशान डिक्वेला, धनंजय डीसिल्व्हा, भानुका राजपक्षा, ओशाडा फर्नाडो, वानिंडू हसरंगा, लाहिरू कुमारा, कुशल मेंडिस, लक्षण संडाकन, कुशल रजिता.

धवनच्या कामगिरीकडे लक्ष : दुसऱ्या सलामीवीराच्या स्थानासाठी लोकेश राहुलशी स्पर्धा करणाऱ्या शिखर धवनच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत उपकर्णधार रोहित शर्माच्या साथीने सलामीसाठी लोकेशचे पारडे जड दिसत आहे. धवनने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ३२ धावा केल्या होत्या.

* सामन्याची वेळ : सायं. ७ वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १.