दिल्लीकरांनी पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस गाजवला. संघनायक विराट कोहली आणि सलामीवीर शिखर धवन यांनी शानदार शतकी खेळी साकारल्याने भारताला समाधानकारक धावसंख्या उभारता आली. त्यानंतर दिवसअखेर श्रीलंकेच्या सलामीवीरांची पडझड झाली. त्यामुळे १८७ धावांनी अद्याप पिछाडीवर असलेल्या श्रीलंकेला डावाने पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. संपूर्ण मालिकेत प्रथमच नेतृत्व करणाऱ्या कोहलीच्या भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर वर्चस्व प्राप्त केले आहे.
श्रीलंकेच्या तुटपुंज्या १८३ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना गुरुवारी भारताने ११७.४ षटकांत ३७५ धावा उभारल्या. कोहली आणि धवनने तिसऱ्या विकेटसाठी २२७ धावांची भागीदारी रचून भारताच्या धावसंख्येचा पाया रचला. यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने (६०) पहिलेवहिले अर्धशतक केले. भारताने पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी घेतल्यानंतर उत्तरार्धातील ४ षटकांत श्रीलंकेची २ बाद ५ अशी केविलवाणी अवस्था झाली.
श्रीलंकेकडून ऑफ-स्पिनर थरिंदू कौशलने सर्वात प्रभावी गोलंदाजी करताना ३२.४ षटकांत १३४ धावांत ५ बळी घेतले, वेगवान गोलंदाज न्यूवान प्रदीपने ९८ धावांत ३ बळी घेतले.
त्यानंतर, रविचंद्रन अश्विनने पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर ‘दूसरा’ अस्त्र टाकून दिमुथ करुणारत्नेला (०) तंबूची वाट दाखवली. कर्णधार कोहलीने दुसऱ्या बाजूनेही फिरकी मारा केला. अमित मिश्राने आपल्या गुगलीच्या बळावर कौशल सिल्व्हाचा भोपळा न फोडता त्रिफळा उडवला. खेळ थांबला तेव्हा धम्मिका प्रसाद ३ आणि कुमार संगकारा १ धावांवर खेळत होते.
तीन दिवसांचा खेळ शिल्लक असल्याने श्रीलंकेला सामना वाचवून भारताला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेण्यापासून रोखण्याचे आव्हान असेल. खेळपट्टीवर चेंडू चांगलाच वळतोय आणि खाली राहात असल्यामुळे फिरकीपटू अश्विन त्याचा चांगला फायदा घेऊ शकेल.
भारताने पहिल्या डावात जरी चांगली आघाडी घेतली तरी, त्यांना धावांचा वेग समाधानकारक राखता आला नाही. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने ८३.४ षटकांत २४७ धावा केल्या. परंतु भारताच्या धावसंख्येचे श्रेय कोहली आणि धवन यांना द्यायला हवे. २ बाद १२८ या धावसंख्येवरून डावाला पुढे प्रारंभ केल्यानंतर पहिल्या सत्रात या दोघांनी श्रीलंकेच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. कोहलीने १९१ चेंडूंचा सामना करीत ११ चौकारांसह १०३ धावा केल्या, तर धवनने २७३ चेंडूंचा सामना करीत १३ चौकारांनिशी १३४ धावा केल्या. भारताच्या कर्णधाराने ११वे कसोटी शतक झळकावले, तर धवनने चौथ्या व सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली.
धावफलक
श्रीलंका (पहिला डाव) : १८३.
भारत (पहिला डाव) : लोकेश राहुल पायचीत गो. प्रसाद ७, शिखर धवन त्रि. गो. प्रदीप १३४, रोहित शर्मा पायचीत गो. मॅथ्यूज ९, विराट कोहली पायचीत गो. कौशल १०३, अजिंक्य रहाणे पायचीत गो. कौशल ०, वृद्धिमान साहा झे. चंडिमल गो. प्रदीप ६०, रविचंद्रन अश्विन त्रि. गो. प्रदीप ७, हरभजन सिंग त्रि. गो. कौशल १४, अमित मिश्रा त्रि. गो. कौशल १०, इशांत शर्मा नाबाद ३, वरुण आरोन झे. मॅथ्यूज गो. कौशल ४, अवांतर (लेग बाइज १०, वाइड ३, नोबॉल ११) २४, एकूण -११७.४ षटकांत सर्व बाद ३७५.
बाद क्रम : १-१४, २-२८, ३-२५५, ४-२५७, ५-२९४, ६-३०२, ७-३३०, ८-३४४, ९-३६६, १०-३७५
गोलंदाजी : धमिक्का प्रसाद २२-४-५४-१, नुवान प्रदीप २६-२-९८-३, अँजेलो मॅथ्यूज ४-१-१२-१, थरिंदू कौशल ३२.४-२-१३४-५, रंगना हेराथ ३३-४-६७-०
श्रीलंका (दुसरा डाव) : दिमुथ करुणारत्ने त्रि. गो. अश्विन ०, कौशल सिल्व्हा त्रि. गो. मिश्रा ०, धम्मिका प्रसाद नाबाद ३, कुमार संगकारा १, अवांतर (नोबॉल १) १, एकूण ४ षटकांत २ बाद ५
गोलंदाजी : आर. अश्विन २-२-०-१, अमित मिश्रा १-०-१-१, हरभजन सिंग १-०-४-०.