दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली नाबाद १५६ आणि सलामीवीर मुरली विजयच्या १५५ धावांच्या जोरावर भारताने ४ बाद ३७१ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिखर धवन आणि मुरली विजय यांनी भारताच्या डावाला सुरुवात केली.  सुरुवातीला संयमी खेळी करत दोघांनी धावफलक हलता ठेवला. मात्र, १० व्या षटकात सलामीची जोडी फोडण्यात श्रीलंकेला यश आले. दिलरुवान परेराने सलामीवीर शिखर धवनला झेलबाद केले.  त्याने ३५ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीनं २३ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेला चेतेश्वर पुजाराही २३ धावा करुन तंबूत परतला. लाहिरू गमागेच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. दोन गडी गमावल्यानंतर विराट कोहली आणि मुरली विजयने भारताच्या डावाला आकार दिला.  विराटचे आक्रमकपणा आणि मुरलीच्या संयमी खेळीसमोर श्रीलंकन गोलंदाजी हतबल ठरली. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत  मुरली विजयने कारकिर्दीतील ११ वे तर कोहलीने २० वे शतक झळकाले.

श्रीलंकेच्या लक्षन संदाकानने दिवसाच्या अखेरीस भारताचे दोन गडी बाद करत श्रीलंकेला दिलासा दिला. मुरली विजयला त्याने १५५ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या अजिंक्य रहाणेला त्याने अवघ्या एका धावेवर बाद केले. भारताकडून विराट कोहलीने ५ हजार धावांचा टप्पा पार केला. तर दुसरीकडे श्रीलंकेच्या परेराने श्रीलंकेकडून सर्वाधिक जलद १०० बळी मिळवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. पहिल्या दिवसाचा डाव संपला त्यावेळी कोहली १५६ तर रोहित शर्मा ६ धावावर खेळत होते. श्रीलंकेकडून लक्षन संदाकान सर्वाधिक दोन बळी मिळवले.

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी भारतासाठी हा सामना महत्वपूर्ण आहे. कर्णधार विराट कोहलीने फिरोजशहा कोटलाची खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असावी, अशी मागणी केली होती. मात्र, पहिल्या दिवशी भारताने उभारलेली मोठी धावसंख्या पाहता पहिला दिवस हा फलंदाजीसाठी अनुकूल होता, असेच म्हणावे लागले. दुसऱ्या दिवशी खेळपट्टी कशी खेळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी, संदाकानने त्याला अवघ्या एका धावेवर बाद केले.

  • भारताला तिसरा धक्का, मुरली विजय तंबूत परतला, लक्षन संदाकान श्रीलंकेला मिळवून दिले तिसरे यश

  • भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीतील २० वे शतक पूर्ण केले.
  • सलामीवीर मुरली विजयने साजरे केले अकरावे कसोटी शतक

  • सलामीवीर शिखर धवन श्रीलंकन गोलंदाज परेराचा १०० वा बळी ठरला. परेराने सर्वात जलद शंभर विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
  • मुरली विजय आणि विराट कोहली यांच्यात २०१ चेंडूत १५२ धावांची भागीदारी

  • सुरंगाच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार खेचत विराटने कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील ५ हजार धावांचा टप्पा पार केला.

  • उपहारापूर्वी श्रीलंकेला दोन गडी बाद करण्यात यश, दिलरुवान परेरा आणि लाहिरू गमागे यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
मुरली विजय छाया सौजन्य (बीसीसीआय)

 

  • दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात सलामीवीर मुरली विजयने कारकिर्दीतील १६ वे अर्धशतक साजरे केले.
  • चेतेश्वर पुजारा झेलबाद, लाहिरू गमागेने श्रीलंकेला मिळवून दिले दुसरे यश

  • धवननं ३५ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीनं २३ धावा केल्या
  • भारताला पहिला धक्का, शिखर धवन बाद
  • ९ षटकानंतर भारताची धावसंख्या बिनबाद ३६ अशी आहे.
  • पहिल्या ९ षटकांमध्ये भारतीय सलामवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांनी चारच्या सरासरीनं धावा केल्या.
  • सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजयने भारताच्या डावाला सुरुवात केली.

  • भारतीय कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.