भारतीय क्रिकेट मंडळाच्या निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे सामन्यासाठी संघाची घोषणा केली. मुंबईकर श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळाल्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार का? असा प्रश्न होता. बीसीसीआय अनुभवी रहाणेकडे पर्यायी सलामीवीर म्हणून पाहत असल्यामुळे श्रेयस अय्यरनं श्रीलंकेविरुद्ध वनडे कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्या सामन्यात आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर चांगली खेळी करण्याची संधी त्याला मिळाली. मात्र, यावेळी  संधीच सोनं करण्यात तो अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात त्याला केवळ ९ धावा करता आल्या.

मोहालीच्या मैदानात सलामीवीरांनी केलेल्या चांगल्या सुरुवात करुन दिली. धवन बाद झाल्यानंतर कर्णधार रोहितला सुरेख साथ देत श्रेयसने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. धनंजयाच्या गोलंदाजीवर एक धाव घेत श्रेयसने आपले पहिले अर्धशतक साजरे केले. श्रेयसने ७० चेंडूत ९ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ८८ धावांची दमदार खेळी केली. श्रेयस शतकी खेळी साकारणार असे वाटत असताना अखेरच्या षटकात धावांची सरासरी वाढवण्याचा प्रयत्न करताना परेराच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.