सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने वाढदिवशी झळकावलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पहिल्यावहिल्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा १३४ धावांनी धुव्वा उडवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वॉर्नरच्या नाबाद १०० धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत २ बाद २३३ धावांचा डोंगर उभा केला. या खेळीदरम्यान त्याने कर्णधार अ‍ॅरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासह शतकी भागीदाऱ्या रचल्या. त्यानंतर लेगस्पिनर अ‍ॅडम झॅम्पाच्या प्रभावी फिरकीमुळे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ९ बाद ९९ धावांवर रोखत दणदणीत विजयाची नोंद केली.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज कसुन रजिता हा टी २० इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला. रजिताने ४ षटकांत एकही बळी न मिळवता ७५ धावा बहाल केल्या. या आधी हा नकोसा विक्रम टर्कीच्या तुनाहान तुरान याच्या नावे होता. त्याने ऑगस्ट २०१९ मध्ये चेक प्रजासत्ताक विरोधात झालेल्या सामन्यात ४ षटकात ७० धावा देत १ बळी टिपला होता. तो लाजिरवाणा विक्रम आता रजिताच्या नावे झाला.

दरम्यान, अ‍ॅशेस मालिकेतील सुमार कामगिरीनंतर अवघ्या ५६ चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद शतक झळकावत वॉर्नरने आपणही लयीत आल्याचे दाखवून दिले. वॉर्नरने डावाच्या अखेरच्या चेंडूवर आपले शतक साजरे केले. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी श्रीलंकेची आघाडीची फळी नेस्तनाबूत करत पाहुण्यांना ५ बाद ५० अशा अडचणीत आणले होते. त्यानंतर झॅम्पाने अखरेचे तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवून दिला.

धावफलक – ऑस्ट्रेलिया २० षटकांत २ बाद २३३ (डेव्हिड वॉर्नर नाबाद १००, आरोन फिंच ६४, ग्लेन मॅक्सवेल ६२) विजयी वि. श्रीलंका : २० षटकांत ९ बाद ९९ (दासून शनाका १७; अ‍ॅडम झॅम्पा ३/१४)