आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक साजरे करत धावांचा डोंगर उभा करणाऱ्या सचिनचा सर्वाधिक शतकासह धावांचा विक्रम आजही अबाधित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिननं तब्बल ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. विक्रमवीर सचिननं आजच्याच दिवशी अहमदाबादच्या मैदानात ३० हजार धावांचा टप्पा पार केला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सचिन ज्यावेळी मैदानात उतरला त्यावेळी त्याला ३० हजार धावांचा टप्पा पार करण्यास ३५ धावांची आवश्यकता होती. सामन्याच्या शेवटच्या दिवशी सचिनने विक्रमी धावांचा टप्पा पार केला. या सामन्यात सचिनने कारकिर्दीतील ८८ वे शतक साजरे केले होते. हा सामना अनिर्णित राहिला होता. २००९ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात अहमदाबादच्या मैदानावर १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. पहिल्या डावात सचिन तेंडुलकर अवघ्या ४ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर त्याने १०० धावांची शतकी खेळी केली.

आता देखील श्रीलंका भारत दौऱ्यावर आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आज पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरला. या सामन्यात पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीनं नाबाद शतकी खेळी केली. त्याने आपल्या कारकिर्दीतील ५० वे शतक साजरे केलं. ज्याप्रमाणे श्रीलंकेविरुद्ध सचिननं विक्रमी धावांचा टप्पा ओलांडला होता. त्याप्रमाणे विराटने कारकिर्दीतील ५० शतकांचा टप्पा ओलांडला. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या विराटने दुसऱ्या डावात १०४ धावांची खेळी करत सामन्यात एकूण १०४ धावा केल्या. ८ वर्षांपूर्वी म्हणजे अहमदाबादमधील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत सचिन तेंडुलकरने पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात १०० अशा एकूण १०४ धावा केल्या होत्या.

क्रिकेट वर्तुळात सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात नेहमीच तुलना होताना दिसते. मात्र, आजचा दिवस हा दोघांच्या आकडेवारीचा अनोखा योगायोग दाखवणारा असाच आहे, असे ही आकडेवारी सांगते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावे सर्वाधिक शतके आहेत. विराट कोहली सचिनचा हा विक्रम पार करेल, अशी चर्चा नेहमीच रंगत असते.