पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत मालिका विजयाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दुसरीकडे श्रीलंकेसाठी हा सामना ‘करो, या मरो’ असाच असणार आहे. कारण हा सामना गमावल्यास त्यांना मालिका गमवावी लागणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेला सर्वतोपरी प्रयत्न करावा लागणार आहे.
दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. सलामीवीर शिखर धवनने दोन्ही सामन्यांमध्ये दमदार खेळी साकारल्या आहेत, तर गेल्या सामन्यात अंबाती रायुडूने तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येत अप्रतिम नाबाद शतक झळकावले होते. अजिंक्य रहाणेही चांगल्या फॉर्मात आहे. पण कर्णधार विराट कोहली आणि सुरेश रैना यांना अजूनही मोठी खेळी साकारता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत अचूक मारा केला आहे.
गेल्या सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधाराने नाबाद शतकासमीप जाणारी खेळी साकारली होती, पण तरीही संघाला तिनशे धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने या त्रिदेवांपैकी एकालाही सूर गवसलेला नाही. श्रीलंकेची गोलंदाजी दोन्ही सामन्यांमध्ये बोथट होती. त्यामुळे त्यांना जर सामना जिंकायचा असेल तर त्यांना गोलंदाजीवर अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
प्रतिस्पर्धी संघ :
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, धवल कुलकर्णी, उमेश यादव, इशांत शर्मा, अमित मिश्रा, मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), महेला जयवर्धने, अशन प्रियंजन, निरोशान डिकवेला, थिसारा परेरा, नुवान कुलसेकरा, धम्मिका प्रसाद, लाहिरू गमगे, चतुरंगा डीसिल्व्हा, सीक्युगे प्रसन्ना, सूरज रणदीव.
सामन्याची वेळ : दु. १.३० वा. पासून.  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.
भारत विश्वचषक जिंकू शकतो -सचिन
लंडन : भारताला आगामी विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी असून फिरकीपटू या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका निभावू शकतील, असे मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.