भारताचा श्रीलंकेविरुद्ध आज पहिला ट्वेन्टी-२० सामना

पीटीआय, कोलंबो

आगामी ट्वेन्टी -२० विश्वचषकाच्या दृष्टीने उपलब्ध खेळाडूंची चाचपणी करण्याची अखेरची संधी भारताकडे आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला रविवारपासून प्रारंभ होणार असून निश्चितपणे भारताचेच पारडे या मालिकेतसुद्धा जड आहे.

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने एकदिवसीय २-१ असे यश मिळवले. या मालिकेत भारताकडून एकूण सात जणांनी पदार्पण केले. आता ट्वेन्टी-२० मालिकेत डावखुरा सलामीवीर देवदत्त पडिक्कल, महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांना पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे दसून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिकेत अधिक सुधारित कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.

’ सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

’ थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३ (हिंदी)

भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका

सूर्यकुमार, पृथ्वी इंग्लंड दौऱ्यावर

नवी दिल्ली : पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव या मुंबईकर फलंदाजांची इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जायबंदी खेळाडूंच्या जागी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र सूर्यकुमार आणि पृथ्वी श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळून मग इंग्लंडला जाणार की त्यांना या मालिकेला मुकावे लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.