श्रीलंकेविरुद्ध आज लढत; रोहित, शिखरच्या खेळण्याबाबत साशंकता; मलिंगाही दुखापतग्रस्तच
यजमान बांगलादेश आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवल्यानंतर भारतीय संघ आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध विजयासह हॅट्ट्रिकसाठी सज्ज झाला आहे. श्रीलंकेच्या संघापेक्षा भारतीय संघासमोर आव्हान आहे ते दुखापतींचे. दुसरीकडे बांगलादेशकडून पराभूत झालेल्या श्रीलंकेला या धक्क्यातून सावरत नव्याने सुरुवात करण्याची आवश्यकता आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर नसल्याचे भारतीय संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले होते. सावधानतेचा उपाय म्हणून रोहित शर्माच्या पायावर क्ष-किरण चाचणी करण्यात आली होती. सोमवारी रोहित सराव शिबिरात सहभागी झाला नाही. भारताला दमदार सलामी मिळवून देण्यात रोहितची भूमिका निर्णायक आहे. श्रीलंकेविरुद्ध तो खेळू न शकल्यास अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी असेल. भारतात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शिखर धवनने फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पायाला झालेल्या दुखापतीमुळे शिखर खेळू शकला नाही. सोमवारी झालेल्या सराव सत्रात शिखर सहभागी झाला, मात्र अद्यापही त्याच्या सहभागाबाबत साशंकता आहे.
रोहित आणि शिखर खेळू न शकल्यास पार्थिव पटेलला संधी मिळू शकते. पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीने सुरेख खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्याच्याकडून पुन्हा एकदा मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. अनुभवी आणि अष्टपैलू युवराज सिंग ही भारताची जमेची बाजू आहे. मात्र पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे युवराजला एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागला होता. १४ धावांसाठी त्याने ३२ चेंडू खर्ची घातले होते. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत तडाखेबंद खेळी करण्याची संधी युवराजकडे आहे. विश्वचषकासाठी अजिंक्य रहाणेची भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र अजूनही या प्रकारात त्याने लौकिकाला साजेशी खेळी केलेली नाही. श्रीलंकेविरुद्धचा सामना अजिंक्यसाठी उत्तम व्यासपीठ आहे. कर्णधार धोनी पाठदुखी असतानाही खेळत आहे. सुरेश रैनाला कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे. हार्दिक पंडय़ा अष्टपैलुत्व सिद्ध करण्यासाठी तयार आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा ही फिरकी जोडगोळी भारताचे हुकमी अस्त्र आहे. त्यांना जसप्रीत बुमराह आणि अनुभवी आशीष नेहराने उत्तम साथ दिली आहे. स्पर्धेतल्या प्रत्येक लढतीत क्षेत्ररक्षण भारतीय संघाचे बलस्थान ठरले आहे.
श्रीलंकेचा संघ फॉर्म आणि दुखापती यांनी वेढलेला आहे. कर्णधार लसिथ मलिंगा बांगलादेशविरुद्ध खेळू शकला नाही. भारताविरुद्धही तो खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्याच्या अनुपस्थितीत अँजेलो मॅथ्यूजने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. अष्टपैलू तिलकरत्ने दिलशानला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पारंपरिक फटक्यांऐवजी आत्मघातकी फटके मारणे दिनेश चंडिमलला टाळावे लागणार आहे. बांगलादेशमधील खेळपट्टय़ांचा पुरेसा अनुभव असलेला चामरा कपुगेडराला फलंदाजीत बढती मिळू शकते. अँजेलो मॅथ्यूज आणि थिसारा परेरा यांच्याकडून तडाखेबंद खेळीची अपेक्षा आहे. नुवान कुलसेकरा आणि दुश्मंच चमीरा ही वेगवान गोलंदाजांची जोडगोळी भारताचे आशास्थान आहे. रंगना हेराथ, मिलिंदा सिरीवर्दना आणि सचित्र सेनानायके या फिरकी त्रिकुटावर धावा रोखण्याबरोबरच विकेट्स मिळवण्याची जबाबदारी आहे.
खेळपट्टीवर हिरवे गवत असल्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यालाच प्राधान्य मिळू शकते. दुखापतींची समस्या असली तरी या लढतीत भारताचे पारडे जड आहे.

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, पवन नेगी, आशीष नेहरा, हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, पार्थिव पटेल.
श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), तिलकरत्ने दिलशान, दिनेश चंडिमल, शेहान जयसूर्या, अँजेलो मॅथ्यूज, चामरा कपुगेडरा, नुवान कुलसेकरा, दासुन शनका, दुश्मंत चमीरा, मिलिंदा सिरीवर्दना, रंगना हेराथ, निरोशन डिकवाला, थिसारा परेरा, जेफ्री व्हँडरसे, सचित्र सेनानायके.
वेळ : संध्याकाळी ७ पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट १, ३ आणि एचडी वाहिन्यांवर