श्रीलंकेविरुद्धचा तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना आज कोलंबोत

पीटीआय, कोलंबो

पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर आता श्रीलंकेविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात बदल अपेक्षित आहेत. विजयी संघ कायम ठेवावा की त्यात बदल करावा, याचा निर्णय आता प्रशिक्षक राहुल द्रविड यांना घ्यावा लागणार आहे.

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला सामना सात गडी राखून जिंकला. त्यानंतर दीपक चहरच्या नाबाद ६९ धावांच्या खेळीमुळे भारताने दुसरी लढत तीन गडी राखून जिंकली. आता ४३ आणि १३ धावांची खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉ यालाच सलामीला पाठवावे की त्याच्या जागी देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाला संधी द्यावी, हे संघव्यवस्थापनाला ठरवावे लागणार आहे.

आक्रमक फलंदाज इशान किशन याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. मनीष पांडे आणि सूर्यकुमार यादव यांचे संघातील स्थान अबाधित राहणार आहे. युवा गोलंदाज नवदीप सैनी आणि चेतन सकारिया यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

भारत-श्रीलंका क्रिकेट मालिका

भारत : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, कृष्णप्पा गौतम, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी.

श्रीलंका : दसून शनाका (कर्णधार), धनंजया डी सिल्व्हा, अविष्का फर्नाडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरिथ असलंका, वाहिंदू हसरंगा, अशेन बंदारा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुशमंथा चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरन फर्नाडो, धनंजया लक्षण, इशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नाडो, कसून रजिथा, लाहिरू कुमारा, इसुरू उडाना.

वॉशिंग्टन सुंदरची दुखापतीमुळे माघार

अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याने बोटाच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. एकही सामना न खेळता सुंदरला दुसऱ्यांदा इंग्लंड दौऱ्यातून मायदेशी परतावे लागणार आहे. याआधी २०१८मध्येही घोटय़ाच्या दुखापतीमुळे सुंदरला भारतात परतावे लागले होते. शुभमन गिल आणि आवेश खाननंतर इंग्लंड दौऱ्यातून माघार घेणारा सुंदर हा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे.