भारत विरुद्ध श्रीलंका टी २० मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवन खातंही खोलू शकला नाही. चमीराच्या गोलंदाजीवर धनंजय डिसिल्वाने त्याचा झेल घेतला.त्यानंतर एकापाठोपाठ एक असे चार गडी झटपट बाद झाले. ऋतुराज गायकवड, देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन मैदानात तग धरू शकले नाहीत. ऋतुराज गायवड १४, देवदत्त पडिक्कल ९ तर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. नितीश राणाही चांगली कामगिरी करू शकला नाही. दासून शनाकाच्या गोलंदाजीवर त्याने त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला.

तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. श्रीलंकेतील प्रेमदासा मैदानावर अंतिम सामना रंगणार आहे. श्रीलंका दौर्‍यावर वनडे मालिका २-१ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी आहे. पहिला टी २० सामना भारताने ३८ धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या टी २० सामन्यात श्रीलंकेने भारताला ४ गडी राखून पराभूत केलं होतं.

दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला गंभीर दुखापत झाल्याने आजच्या सामन्यात त्याला आराम देण्यात आला आहे. नवदीप सैनीने दुसऱ्या टी २० सामन्यात गोलंदाजी केली नव्हती. जखमी नवदीप सैनी याच्या जागेवर संदीप वॉरिअरला ११ खेळाडूच्या संघात स्थान मिळालं आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेकडून पथुम निसांका पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे.

दोन्ही संघातील खेळाडू

भारत- ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, देवदत्त पडिक्कल, संजु सॅमसन, नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, संदीप वॉरिअर, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्थी

श्रीलंका- अविक्सा फर्नांडो, पथुम निसंका, मिनोद भानुका, सदीरा समरविक्रमा, दासुन शनाका, धनंजया डि सिल्वा, वानिन्दु हसरंगा, रमेश मेंडिस, चमिका करुनारत्ने, अकिला धनंजया, धुशमंथा चमीरा