कसोटी मालिकेमध्ये वेस्ट इंडिजला चारही मुंडय़ा चीत करून भारतीय संघाने त्यांची लक्तरे वेशीवर टांगली होती. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजवर सहज विजय मिळवल्यामुळे एकदिवसीय क्रिकेट मालिकेतही विजयाचा हा ध्वज उंचावत ठेवण्याची भारतीय संघाकडून देशवासियांची अपेक्षा असेल. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गुरुवारपासून पहिल्या एकदिवसीय सामना होणार आहे. या तीन एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ संभाव्य विजेता समजला जात असला तरी वेस्ट इंडिजच्या संघामध्येही धक्का देण्याची नक्कीच कुवत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची सात एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने जिंकली होती ती फक्त आणि फक्त फलंदाजांच्याच जोरावर. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने द्विशतक झळकावत मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला होता. त्यामुळे या मालिकेत रोहित कामगिरीतले सातत्य कायम राखतो का, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल. त्याचबरोबर त्याचा सहकारी शिखर धवनकडूनही संघाला अपेक्षा असतील. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या अप्रतिम खेळी गेल्या मालिकेत पाहता आल्या. त्यामुळे या मालिकेत तो काय कमाल दाखवतो, याकडेही साऱ्यांचे लक्ष असेल. सुरेश रैना आणि युवराज सिंग हे चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नसून त्यांच्यासाठी ही मालिका फॉर्मात येण्याची नामी संधी असेल. महेंद्रसिंग धोनीने गेल्या मालिकेत लौकिकाला साजेशी फलंदाजी केली होती, त्यामुळे त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. अष्टपैलू रवींद्र जडेजाची गोलंदाजी चांगली होत असली तरी त्याच्याकडून चांगली फलंदाजी झालेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय गोलंदाजीला कणा नसल्याचेच चित्र होते. भारताच्या एकाही गोलंदाजाला फलंदाजांना वेठीस धरता आले नव्हते. आर. विनय कुमारसाठी ही कदाचित अखेरची संधी ठरू शकले, तर मोहित शर्माला खेळण्याची संधी या मालिकेत मिळणार का, हे पहावे लागेल.
वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेमध्ये दोन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आणि काही खेळाडू चमक दाखवू शकतात. अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार ड्वेन ब्राव्होकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. कसोटी क्रिकेटमध्ये जास्त धावा करू न शकलेला धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल या मालिकेत काय करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. तर गोलंदाजीमध्ये संघातील फिरकीपटू सुनील नरीनकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, अंबाती रायुडू, अमित मिश्रा, जयदेव उनाडकट, आर. विनय कुमार आणि मोहित शर्मा.
वेस्ट इंडिज : ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), टिनो बेस्ट, डॅरेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, नरसिंग देवनरीन, ख्रिस गेल, जेसन होल्डर, सुनील नरीन, वीरस्वामी पेरमल, किरॉन पॉवेल, दिनेश रामदिन, रवी रामपॉल, डॅरेन सॅमी, मालरेन सॅम्युअल्स आणि लिन्डेल सिमोन्स.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-३
वेळ : दुपारी १.३० वा. पासून.