News Flash

वस्त्रहरण! भारताचा वेस्ट इंडिजवर सहा विकेट्स राखून विजय

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे पुन्हा एकदा भारतीय फिरकीच्या तालावर वस्त्रहरण पाहायला मिळाले आणि सामन्याचा निकाल काही तासांमध्येच स्पष्ट झाला.

| November 22, 2013 03:59 am

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे पुन्हा एकदा भारतीय फिरकीच्या तालावर वस्त्रहरण पाहायला मिळाले आणि सामन्याचा निकाल काही तासांमध्येच स्पष्ट झाला. रवींद्र जडेजा, सुरेश रैना आणि आर. अश्विन यांनी वेस्ट इंडिजच्या आठ फलंदाजांना तंबूत धाडत भारताच्या विजयाचा पाया रचला व फलंदाजांनी अपेक्षित फलंदाजी करत त्यावर कळस चढवला. फिरकीच्या जाळ्यात अडकलेल्या वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करताना २११ धावा करता आल्या. भारताने हे आव्हान सहा विकेट्स राखत पूर्ण करत विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
वेस्ट इंडिजचे २१२ धावांचे आव्हान भारतासाठी माफक वाटत असले, तरी डावाची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. शिखर धवनला (५) भारताने स्वस्तात गमावले. पण त्यानंतर मात्र जबरदस्त फॉर्मात असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले. रोहितने ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७२ धावांची खेळी साकारली, तर षटकार ठोकून कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीत पाच हजार धावांचा पल्ला गाठला. पण कोहलीलाही यावेळी शतकाचा उंबरठा ओलांडता आला नाही. कोहलीने ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ८६ धावांची अप्रतिम खेळी साकारली. रोहित आणि विराट हे दोघेही मोठे फटके मारण्याचा नादात बाद झाले आणि या दोघांनाही भारताला विजयावर शिक्कामोर्तब करून देता आले नाही.
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण या दौऱ्यात त्यांच्या फलंदाजीला ताठ कणा नसल्याचे पुन्हा एकदा या सामन्यात सर्वासमोर आले. पहिल्याच षटकात ख्रिस गेल (०) धावचीत झाला आणि वेस्ट इंडिजची तडाखेबंद सुरुवात होऊ शकणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर सलामीवीर चार्ल्स जॉन्सन (४२) आणि डॅरेन ब्राव्हो यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण भारताच्या गोलंदाजीपुढे खास करून फिरकीपटूंपुढे वेस्ट इंडिजचे काहीही चालले नाही.
ब्राव्होने ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने डावातील एकमेव अर्धशतकी (५९) खेळी साकारली. भारताची धारदार फिरकी आणि ठरावीक फरकाने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना तंबूत परतण्याची घाई, हेच चित्र सामन्याच्या पहिल्या डावात पाहायला मिळाले आणि त्यांचा डाव २११ धावांवर संपुष्टात आला. रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत वेस्ट
 इंडिजचे कंबरडे मोडले, तर आर. अश्विनने दोन बळी मिळवत त्यांना चांगली साथ दिली.

धावफलक
वेस्ट इंडिज : ख्रिस गेल धावचीत (कुमार) ०, जॉन्सन चार्ल्स झे. व गो. जडेजा ४२, मालरेन सॅम्युअल्स त्रि.गो. रैना २४, डॅरेन ब्राव्हो त्रि. गो. शामी ५९, लेंडल सिमॉन्स पायचीत गो. रैना २९, नरसिंग देवनरिन त्रि. गो. रैना ४, ड्वेन ब्राव्हो यष्टिचीत धोनी गो. जडेजा २४, डॅरेन सॅमी झे. कुमार गो. जडेजा ५, जेसन होल्डर नाबाद १६, सुनील नरिन झे. व गो. अश्विन ०, रवी रामपॉल झे. धवन गो. अश्विन १, अवांतर (लेग बाइज १, वाइड ६) ७, एकूण ४८.५ षटकांत सर्व बाद २११.
बाद क्रम : १-०, २-६५, ३-७७, ४-१४२, ५-१५२, ६-१८३, ७-१८७, ८-२०४, ९-२०६, १०-२११.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-०-२६-०, जयदेव उनाडकट ६-०-३९-०, मोहम्मद शामी ६-०-२८-१, रवींद्र जडेजा १०-०-३७-३, सुरेश रैना १०-१-३४-३, आर. अश्विन ९.५-०-४२-२, रोहित शर्मा २-०-४-०.
भारत : रोहित शर्मा झे. सिमॉन्स गो. रामपॉल ७२, शिखर धवन झे. चार्ल्स गो. होल्डर ५, विराट कोहली झे. नरिन गो. होल्डर ८६, , युवराज सिंग नाबाद १६, सुरेश रैना झे. होल्डर गो. नरीन ०, महेंद्रसिंग धोनी नाबाद १३, अवांतर (बाइज ५, वाइड १५) २०, एकूण ३५.२ षटकांत ४ बाद २१२.
बाद क्रम : १-१७, २-१५०, ३-१९२, ४-१९४.
गोलंदाजी : रवी रामपॉल ८-०-३९-१, जेसन होल्डर ८-०-४८-२, डॅरेन सॅमी २-०-१४-०, सुनील नरिन १०-१-५७-१, नरसिंग देवनरीन २-०-१५-०, लेंडल सिमॉन्स ३-०-१४-०, ड्वेन ब्राव्हो २.२-०-२०-०.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 3:59 am

Web Title: india vs west indies 1st odi live score visitors bat in humid conditions
टॅग : Cricket News
Next Stories
1 कार्लसन आनंदला!
2 आनंदचे साम्राज्य संकटात
3 हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : सायना गारद
Just Now!
X