|| प्रशांत केणी

ब्रेबॉर्नवर आज भारतापुढे योग्य संघबांधणीचे आव्हान

पुण्यात अपेक्षेप्रमाणे विराट कोहलीच्या ‘विराटगाथे’चा तिसरा अध्याय विक्रमाने आणि शतकाने लिहिला गेला. परंतु सहा फलंदाज आणि पाच गोलंदाज अशा विशेषज्ञ संघबांधणीची उणे बाजू भारताच्या पराभवासह समोर आली. त्यामुळेच ब्रेबॉर्न स्टेडियमवर चौथ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह मालिकेत आघाडी मिळण्यासाठी भारताला आटापिटा करावा लागणार आहे. आत्मविश्वास उंचावलेल्या वेस्ट इंडिजशी भिडताना संघातील योग्य समतोल साधण्याचे प्रमुख आव्हान भारतापुढे असेल.

अष्टपैलू खेळाडूंची प्रमुख उणीव भासणाऱ्या भारतीय संघात उर्वरित दोन सामन्यांसाठी केदार जाधवचा करण्यात आलेला समावेश अनुकूल ठरू शकेल. योग्य सांघिक समतोल साधण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. केदारच्या समावेशामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी हे दोन्ही विभाग अधिक बळकट होऊ शकतील, अशी कबुली विराट कोहलीने पुण्यातील पराभवानंतर दिली.

गुवाहाटीमध्ये भारताचे वर्चस्व दिसून आले. मग विशाखापट्टणममध्ये वेस्ट इंडिजने तोलामोलाची टक्कर देताना सामना ‘टाय’ राखला. पुण्यात आणखी एक पाऊल पुढे टाकत कॅरेबियन संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाडय़ांवर भारतावर कुरघोडी करीत ४३ धावांनी शानदार विजय मिळवला. एकतर्फी कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभव पत्करणाऱ्या विंडीजने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनपेक्षित मुसंडी मारताना मालिकेत आता १-१ अशी चुरस निर्माण केली आहे. आगामी विश्वविजेतेपदाची तयारी करणाऱ्या भारताकडे योग्य संघबांधणी करण्यासाठी फक्त १५ सामने उपलब्ध आहेत.

विंडीजविरुद्धच्या मालिकेतील तिन्ही सामन्यांत विराटने शतके साकारली आहेत. ब्रेबॉर्नवरही त्याच्याकडून आणखी एका शतकाची अपेक्षा केली जात आहे. मात्र विराटसाठी त्यापेक्षाही महत्त्वाचे असेल ते उर्वरित दोन्ही सामन्यांतील विजयासह विंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकणे. पुण्यात विराट, जसप्रीत बुमराच्या कामगिरीला अन्य खेळाडूंकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.

धोनीसाठी धोक्याची घंटा?

पुण्यात नेत्रदीपक यष्टीरक्षण करणारा महेंद्रसिंग धोनी धावांसाठी झगडत आहे. ट्वेन्टी-२० संघातून डच्चू मिळालेल्या धोनीची फलंदाजीतील कामगिरी सुधारली नाही, तर एकदिवसीय संघातीलसुद्धा त्याचे स्थान धोक्यात असेल. तीन सामन्यांतील दोन डावांत त्याने २७ धावा केल्या आहेत. पुण्यात धोनीआधी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी केली, पण फटकेबाजीच्या नादात तो लवकर बाद झाला. शिखर धवन, रोहित शर्मा यांच्याकडून दमदार सलामीची भागीदारी अद्याप झालेली नाही. मधल्या फळीची चिंता अजूनही मिटलेली नाही. चौथ्या क्रमांकावर अंबाती रायुडू सातत्यपूर्ण फलंदाजी करीत आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराने अपेक्षित पुनरागमन करताना विंडीजच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला.

संघ : भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, उमेश यादव, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव.

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), फॅबियान अ‍ॅलीन, सुनील अ‍ॅम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंदरपॉल हेमराज, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, अल्झारी जोसेफ, अ‍ॅश्ले नर्स, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, केमार रोच, मार्लन सॅम्युअल्स, ओशाने थॉमस, ओबॅड मॅकॉय, किरॉन पॉवेल.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी.