राहुल, मयांकसुद्धा लवकर माघारी; पुजारा, रोहित यांची अर्धशतके

भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे शनिवारी वेस्ट इंडिज अध्यक्षीय एकादश संघाविरुद्ध स्वस्तात माघारी परतला. त्याशिवाय सलामीवीरांनाही विंडीजच्या वेगवान माऱ्यापुढे चमक दाखवता न आल्यामुळे सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी उपहाराला भारताची ३ बाद ८९ धावा अशी अवस्था झाली होती. परंतु चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतके झळकावून भारताचा डोलारा सावरला.

नियमित कर्णधार विराट कोहलीने या सामन्यातून माघार घेतल्यामुळे कर्णधाराची भूमिका बजावणाऱ्या रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; परंतु मयांक अगरवाल १२ धावांवर बाद झाल्याने रहाणेचा निर्णय चुकला. जोनाथन कार्टरने त्याला बाद केले. तीन षटकांच्या अंतरात लोकेश राहुलही (३६) माघारी परतल्यामुळे कर्णधार रहाणेकडून अपेक्षा होत्या; परंतु कार्टरच्याच एका अप्रतिम चेंडूवर रहाणे अवघ्या १ धावेवर यष्टिरक्षकाकडे झेल देत पॅव्हेलियनमध्ये परतला. २०१७ नंतर रहाणेला कसोटीत एकही शतक झळकावता आले नसल्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर अनेकांनी टीका केली होती. विशेषत: श्रेयस अय्यर, हनुमा विहारी यांसारखे युवा खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत असताना रहाणेवर विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करण्याचे दडपण असेल. ३ बाद ५३ धावांवरून भरवशाचा फलंदाज पुजारा आणि रोहित शर्मा यांनी मोर्चा सांभाळला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा पुजारा ५९, तर रोहित ५५ धावांवर खेळत होता.

संक्षिप्त धावफलक

  • भारत : ५० षटकांत ३ बाद १६७ (चेतेश्वर पुजारा ५९, रोहित शर्मा ५५*, लोकेश राहुल ३६; जोनाथन कार्टर २/२४).