भारताचा आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना

पावसामुळे वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना वाया गेल्यानंतर रविवारी दुसरा सामना पूर्णपणे झाल्यास गुणी फलंदाज श्रेयस अय्यरला चौथ्या स्थानावर हक्क प्रस्थापित करण्याची संधी मिळू शकेल.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत अय्यरला खेळायची संधी मिळाली नाही, तर संधी मिळालेला गयानाचा एकदिवसीय सामना १३ षटकांनंतर रद्द करण्यात आला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत अय्यरला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांचे मार्गदर्शन दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अय्यरसाठी पूरक ठरू शकेल.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात लोकेश राहुलला संघात स्थान मिळाले नव्हते. विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत शिखर धवनने दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर राहुलने सलामीवीराची भूमिका उत्तमपणे बजावली होती. या पाश्र्वभूमीवर राहुलचा पर्यायी सलामीवीर म्हणूनच संघाची योजना असावी. त्यामुळे धवन किंवा रोहितला दुखापत झाली तरच त्याला संधी मिळू शकेल.

अहमदला वगळणार?

वेगवान गोलंदाज खलील अहमदला अंतिम ११ जणांमधून वगळण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या सामन्यात फलंदाजांना तीन षटकांत २७ धावा काढू देणारा अहमद महागडा ठरला होता. पावसामुळे सामना स्थगित झाला, तेव्हा सलामीवीर एव्हिन लेविसने अहमदच्या गोलंदाजीवर आक्रमण करताना नाबाद ४० धावा केल्या होत्या. अहमदऐवजी नवख्या नवदीप सैनीचा किंवा यजुर्वेद्र चहलचा संघात समावेश केला जाईल. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही विश्रांती दिली जाऊ शकते.

धावांसाठी झगडणाऱ्या गेलकडून आशा

लेविसला गवसलेला सूर वेस्ट इंडिजसाठी दिलासादायक आहे. मात्र धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल कारकीर्दीमधील अखेरच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात अपयशी ठरला, ही वेस्ट इंडिजसाठी तीव्र चिंतेची बाब आहे. त्याने ३१ चेंडूंत फक्त ४ धावाच करून क्रिकेटरसिकांची घोर निराशा केली. त्यामुळे आता अखेरच्या दोन सामन्यांत त्याला आपल्या फलंदाजीची नजाकत दाखवण्याची संधी असेल.

केदारसाठी अखेरची संधी

विश्वचषक स्पध्रेतील अपयशी कामगिरीनंतर यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला भारतीय संघातून वगळण्यात आले. अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधवसाठीसुद्धा ही मालिका महत्त्वाची असेल. कारण विश्वचषकातील पाच सामन्यांत केदारने फक्त ८० धावा केल्या होत्या. यात अफगाणिस्तानमधील अर्धशतक वगळता त्याची फलंदाजी बहरली नव्हती. गोलंदाजीतसुद्धा तो अपयशी ठरला होता. शुभमन गिलसारखे युवा गुणी खेळाडू भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असताना महाराष्ट्राच्या केदारला आपले स्थान बळकट करणारी कामगिरी करून दाखवावी लागेल. जाधवला आघाडीच्या स्थानांवर फलंदाजी करण्याचे तंत्र अवगत नाही. याचप्रमाणे अखेरच्या षटकांमध्ये सातत्याने फटकेबाजी करण्याची क्षमता नसल्याचेही क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे. कामचलाऊ फिरकी हे त्याचे वैशिष्टय़ कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजासारखे गोलंदाज संघात असताना फारसे उपयुक्त ठरत नाही.