भारत-विंडीज एकदिवसीय मालिका

 विशाखापट्टणम : आघाडीच्या फलंदाजांच्या धावांच्या सातत्यामुळे सलामीच्या सामन्यात वर्चस्व गाजवणाऱ्या भारताचे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पारडे जड मानले जात आहे. मात्र वेस्ट इंडिजचा संघ मालिकेत बरोबरी साधून चुरस टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आतापर्यंत झगडतानाच आढळला आहे. पहिल्या सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी ३२३ धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या आक्रमक फलंदाजीमुळे हे आव्हानसुद्धा थिटे वाटायला लागले. या दोन फलंदाजांनी शानदार शतके झळाकावून आठ षटके शिल्लक असतानाच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आशिया चषक स्पर्धेत सातत्याने धावा करून स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवणारा शिखर धवन पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता. त्याच्याकडून धडाकेबाज सलामीची अपेक्षा आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताच्या मधल्या फळीला पुरेशी संधीच मिळाली नाही. आगामी विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर भारताला मधल्या फळीची चिंता तीव्रतेने भेडसावत आहे.

अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत भारतीय वेगवान मारा प्रभावहीन वाटत आहे. मोहम्मद शमी अत्यंत महागडा ठरला. त्याने १० षटकांत ८१ धावा दिल्या. उमेश यादव आणि नवोदित खलील अहमद यांनीही प्रत्येकी ६४ धावा दिल्या.

मधल्या षटकांत रवींद्र जडेजालाही आपल्या फिरकीचे दडपण राखता आले नव्हते. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध दमदार पुनरागमन करणाऱ्या जडेजाला त्यानंतर कामगिरीतील सातत्य राखता आलेले नाही. पहिल्या सामन्यात ‘चायनामन’ कुलदीप यादवला संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र दुसऱ्या सामन्यासाठी भारताने तेच १२ खेळाडू कायम ठेवल्यामुळे कुलदीप आणि लोकेश राहुलला संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेस्ट इंडिजकडून शिम्रॉन हेटमायरने ७८ चेंडूंत १०६ धावांची दिमाखदार खेळी साकारली होती. हेटमायर आणि कायरेन पॉवेल यांचा फॉर्म विंडीजसाठी अनुकूल ठरू शकेल. मात्र अन्य खेळाडूंचे योगदानसुद्धा मालिकेत टिकण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मार्लन सॅम्युअल्सला पहिल्या सामन्यात भोपळासुद्धा फोडता आला नव्हता.

वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्याची धुरा केमार रोचवर असेल. याशिवाय कर्णधार जेसन होल्डर आणि फिरकी गोलंदाज देवेंद्र बिशू यांच्यावर विंडीजच्या गोलंदाजीची मदार असेल.

संघ

भारत (१२ खेळाडू) : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, के. खलील अहमद, उमेश यादव.

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), फॅबिन अ‍ॅलीन, सुनील अ‍ॅम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंदरपॉल हेमराज, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, अल्झारी जोसेफ, कायरेन पॉवेल, अ‍ॅश्ले नर्स, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, केमार रोच, मार्लन सॅम्युअल्स, ओशाने थॉमस, ओबॅड मॅक्कॉय.

* सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी.

८१ विराट कोहलीने आणखी ८१ धावांची भर घातल्यास तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण करू शकेल. याचप्रमाणे तो सचिनलाही मागे टाकू शकेल. सचिनने २५९ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता, तर विराटच्या खात्यावर २०४ डावांची नोंद आहे.