News Flash

Ind vs WI : जसप्रीत बुमराहचा भेदक मारा, विंडीज फॉलोऑनच्या छायेत

दुसऱ्या दिवसाअखेरीस बुमराहचे ६ बळी

जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी विंडीजची अवस्था ८७/७ अशी दयनीय झाली होती. जसप्रीत बुमराहने हॅटट्रीकची नोंद करत वेस्ट इंडिजचा निम्मा संघ माघारी धाडला. दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडे अजुनही ३२९ धावांची आघाडी आहे, त्यामुळे जमैका कसोटी डावाने जिंकण्याची चांगली संधी विराट कोहलीच्या भारतीय संघाकडे असणार आहे.

दुसऱ्या दिवशी भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. ऋषभ पंत कर्णधार जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. यानंतर जाडेजा-विहारी यांची छोटेखानी भागीदारीही कॉर्नवॉलने तोडली. यानंतर मैदानात आलेल्या इशांत शर्माने हनुमा विहारीची उत्तम साथ देत भारताला मजबूत धावसंख्या उभारुन दिली. दोन्ही फलंदाजांनी नवव्या विकेटसाठी ११२ धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान हनुमा विहारीने कसोटी क्रिकेटमध्ये आपलं पहिलं शतक तर इशांत शर्माने पहिल्या अर्धशतकाची नोंद केली. हनुमा विहारीने १११ तर इशांत शर्माने ५७ धावांची खेळी केली. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर, भारताचे तळातले फलंदाज फारसा प्रतिकार करु शकले नाहीत.

प्रत्युत्तरादाखल विंडीजच्या डावाची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने विंडीजच्या डावाला खिंडार पाडत, यजमान संघाला बॅकफूटवर ढकललं. ब्राव्हो, ब्रूक्स आणि रोस्टन चेस या तिन्ही फलंदाजांना माघारी धाडत हॅटट्रीकची नोंद केली. मधल्या फळीत शेमरॉन हेटमायरने कर्णधार जेसन होल्डरच्या साथीने छोटेखानी भागीदारी रचत विंडीजचा डाव सावरला. मात्र हे दोन्ही फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. त्यामुळे तिसऱ्या दिवशी विंडीजचे फलंदाज फॉलोऑन किती वेळ टाळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 8:34 am

Web Title: india vs west indies 2nd test jasprit bumrah helps team india to take full control on test psd 91
टॅग : Ind Vs WI
Next Stories
1 महाराष्ट्राचे पाऊल अडते कुठे?
2 फेडरर, सेरेना उपउपांत्यपूर्व फेरीत
3 विकसित फलंदाजी आणि नियंत्रित गोलंदाजी जडेजाच्या पथ्यावर शास्त्री
Just Now!
X