कसोटी, वन-डे मालिकेपाठोपाठ विंडीजच्या टीमला टी-२० मालिकेतही पराभवाचा सामना करावा लागला. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत सध्या भारताचा संघ २-० अशा आघाडीवर आहे. टी-२० मालिकेत विंडीजच्या अनुभवी खेळाडूंनी पाठ फिरवल्यामुळेच आम्हाला पराभवाचा सामना करावा लागत असल्याची खंत विंडीजच्या दिनेश रामदीनने बोलून दाखवली आहे. रविवारी या मालिकेतला अखेरचा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.

“सध्याच्या परिस्थितीमध्ये संघ उभा करणं खरचं कठीण गोष्ट आहे. आमच्या सर्व खेळाडूंना जगभरातल्या टी-२० क्रिकेट लीगमध्ये मागणी आहे. त्यामुळे त्यांची उणीव आम्हाला जाणवतेय. आमचे अनुभवी खेळाडू या मालिकेसाठी आले नाहीत म्हणूनच यंदा आम्ही ०-२ ने पिछाडीवर आहोत.” अखेरच्या सामन्याआधी दिनेश आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होता.

सुनील नरीन, ख्रिस गेल यासारखे खेळाडू यंदा विंडीजकडून खेळत नाहीयेत. ड्वेन ब्राव्होने मालिकेआधीच निवृत्ती स्विकारली, त्यामुळे कागदावर मजबूत वाटणारा विंडीजचा संघ मैदानात कमकुवत वाटला. कर्णधार कार्लोस ब्रेथवेटही या मालिकेत फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे अखेरच्या सामन्यात विंडीजचा संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.