वेस्ट इंडिजविरुद्ध आज भारताचा पहिला ट्वेन्टी-२० सामना

हैदराबाद : पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या संघरचनेची रंगीत तालीम शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतही सुरूच असेल. लोकेश राहुल आणि ऋषभ पंत भारतीय संघातील स्थान पक्के करण्यासाठी उत्सुक आहे.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत विश्रांती घेणारा कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. भारताने ऑगस्टमध्ये कॅरेबियन दौऱ्यावर ३-० असे निभ्रेळ यश मिळवले होते. त्याचे उट्टे फेडण्यासाठी वेस्ट इंडिज प्रयत्नशील आहे. विंडीजचा संघ ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पारंगत आहे. कायरॉन पोलार्डसारखा ‘आयपीएल’मध्ये नाणावलेला खेळाडू त्यांचे नेतृत्व करीत आहे. नुकतेच ते लखनौमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध संपूर्ण मालिका खेळले आहेत. त्यामुळे भारतातील वातावरणाशी ते उत्तम समरस झाले आहेत. चेंडू कुरतडल्याप्रकरणी निकोलस पूरनवर असलेल्या चार सामन्यांच्या बंदीमुळे तो पहिल्या सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे शाय होप आणि शिम्रॉन हेटमायर यांच्यावरील जबाबदारी वाढणार आहे.

भारताच्या गोलंदाजीच्या फळीत कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे परतले आहेत. शमीने २०१७ मध्ये अखेरचा ट्वेन्टी-२० सामना भारताकडून खेळला होता, तर भुवनेश्वर दुखापतीतून सावरत पुनरागमन करीत आहे. तो ऑगस्ट महिन्यात कॅरेबियन दौऱ्यावर ट्वेन्टी-२० सामन्यांत खेळला होता. कुलदीप आणि यजुर्वेद्र चहल यांची मनगटी फिरकीची युती पुन्हा होणार आहे.

राहुलला सलामीला संधी

सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नसल्याने शैलीदार फलंदाज राहुलला रोहित शर्माच्या साथीने उत्तम सलामी देण्याची संधी असेल. राहुलने ३१ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ४२.७४च्या सरासरीने एकूण ९७४ धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्येही त्याच्या खात्यावर पुरेशा धावा आहेत.

..तर पंतला पर्याय सॅमसनचा!

महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत पंतला यष्टीरक्षक-फलंदाजाचे स्थान बळकट करण्याची योग्य संधी देण्यात आली. परंतु फलंदाजीतील असातत्य आणि ढिसाळ यष्टीरक्षणामुळे त्याच्या कामगिरीवर नेहमीच टीका होत राहिली आहे. त्यामुळे कसोटी प्रकारात पंतला आपले स्थान गमवावे लागल्याने वृद्धिमान साहा संघात परतू शकला. या संघात संजू सॅमसन हा यष्टीरक्षक-फलंदाजीचा आणखी एक पर्याय उपलब्ध असल्याने पंतला गाफील राहून चालणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी सॅमसनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. परंतु त्याला एकाही सामन्यात खेळवण्यात आले नव्हते.

पंतच्या क्षमतेवर विश्वास -कोहली

आमचा अजूनही पंतच्या क्षमतेवर विश्वास आहे. उत्तम कामगिरी करणे, ही खेळाडूची जबाबदारी असते तरीसुद्धा त्याला खंबीर पाठबळ देणे ही आपली जबाबदारी असते, असे मत कोहलीने व्यक्त केले. पंतला लक्ष्य करू नका. तो विजयवीर आहे, त्याला मनाप्रमाणे खेळू द्या, असे रोहितसुद्धा म्हणाला होता. पंतला योग्य सूर गवसल्यास तो भारताचा आधारस्तंभ होऊ शकेल, असे कोहलीने सांगितले.

वेगवान गोलंदाजीचे एकच स्थान शिल्लक -कोहली

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी जसप्रित बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्यावर भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा असेल. या वेगवान माऱ्यातील फक्त एकच स्थान भरायचे बाकी आहे, असे संकेत कोहलीने दिले आहेत. दीपक चहरने गेल्या काही दिवसांत लक्षवेधी कामगिरी केली आहे. तो उत्तम पर्याय ठरू शकेल, असे कोहली या वेळी म्हणाला.

२६ लोकेश राहुलला (९७४) आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यातील १,००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त २६ धावांची आवश्यकता आहे. एक हजार धावा करणारा तो भारताचा सातवा खेळाडू ठरेल.

११९ मायदेशातील ट्वेन्टी-२० सामन्यांत १,००० धावा पूर्ण करण्यासाठी विराट कोहलीला ११९ धावांची गरज आहे. आतापर्यंत फक्त चार फलंदाजांना अशी कामगिरी जमली असून भारतातर्फे मायदेशात एक हजार धावा करणारा कोहली पहिलाच फलंदाज बनू शकतो.

रोहित शर्मा मायदेशातील ट्वेन्टी-२० लढतींमध्ये ५० षटकारांचा आकडा गाठण्यापासून फक्त सहा षटकार दूर आहे. मार्टिन गप्टिल (७७) आणि कॉनिल मन्रो (७५) यांनी न्यूझीलंडमध्ये खेळताना षटकारांचे अर्धशतक साकारले आहे.

संघ                                         

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऑलीन, ब्रँडन किंग, दिनेश रामदिन, शेल्डन कॉट्रेल, एव्हिन लेविस, शेर्फानी रुदरफोर्ड, शिम्रॉन हेटमायर, ख्ॉरी पीएरी, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनिअर, कीमो पॉल, केसरिक विल्यम्स.

* सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्स १