भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मुंबईत होणारा ट्वेंटी-२० चा आंतरराष्ट्रीय सामना मुंबईवरुन हैदराबाद येथे हलवण्यात आला आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबईत होणार होता. आता हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ११ डिसेंबरला मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना होईल.

वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी निवड समितीने २१ नोव्हेंबरला भारतीय संघ जाहीर केला आहे. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती घेणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ट्वेंटी-२० मालिकेच्या निमित्ताने संघात परतणार आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी आणि भुवनेश्वर कुमार सुद्धा ट्वेंटी-२० आणि वनडे संघात परतणार आहेत. लेग स्पिनर यझुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे दोघेही ट्वेंटी आणि वनडे संघात आहेत. बांगालदेश विरुद्ध झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेत चहल भारतीय संघाचा भाग होता. चायनामन चेंडू टाकण्याचे कौशल्य असलेला कुलदीप यादव मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.