भारत दौऱ्यावरील दोन सराव सामन्यांत हरलेल्या वेस्ट इंडिज संघाने कोचीमधील एकदिवसीय सामन्यात कमाल केली. ख्रिस गेलसारखा स्फोटक फलंदाज आणि सुनील नरिनसारखा जादुई फिरकी गोलंदाज नसतानाही आम्ही परदेशात जिंकू शकतो, हा विश्वास ड्वेन ब्राव्होच्या वेस्ट इंडिज संघाने सार्थ ठरवला. सराव सामन्यात मर्यादा स्पष्ट झालेला विंडीजचा संघ एकदिवसीय सामन्यात हाराकिरी पत्करणार, हा भारताचा अतिआत्मविश्वास पहिल्याच सामन्यात भुईसपाट झाला. त्यामुळे नवी दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सामोरे जाताना भारताला निर्धास्त न राहता ‘जागते रहो’ हाच नारा जपावा लागणार आहे.
कोचीच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि खेळाडू यांच्यातील वादाचे पडसाद उमटले आणि या संघाने सराव सत्रावरच बहिष्कार टाकला. त्यामुळे दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतात आलेल्या या खचलेल्या विंडीज संघाविरुद्ध आपण आरामात मर्दुमकी गाजवू, असे भारतीय संघाला वाटले होते. पण पहिल्याच सामन्यात १२४ धावांनी मानहानीकारक पराभव झाल्यानंतर भारतीय संघाला खडाडून जागे केले आहे. आता नवी दिल्लीतील विजयासह मालिकेत बरोबरी साधण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
कोहलीच्या फॉर्मबाबत भारताला मोठी चिंता
आगामी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या तयारीच्या दृष्टीने महेंद्रसिंग धोनी या मालिकेकडे पाहात आहे. त्यामुळे नव्या रणनीतीबाबत तो सकारात्मक पद्धतीने विचार करीत आहे. कोचीमध्ये भारताची फलंदाजी फक्त १९७ धावांत कोसळली. इंग्लंड दौऱ्यापासून सूर हरवलेल्या विराट कोहलीची फलंदाजी, ही भारताची सर्वात महत्त्वाची चिंता आहे. कोहलीच्या फलंदाजीतील तांत्रिक त्रुटींबाबत भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही सडेतोडपणे आपले मत प्रकट केले आहे. कोहलीने चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी, अशी सूचना गावस्कर यांनी केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारताची धावसंख्या ही कोहलीच्या फलंदाजीवर अवलंबून असते, परंतु सध्या तरी भारताच्या फलंदाजीच्या फळीतील सर्वाचे क्रम निश्चित आहेत. फक्त अंबाती रायुडूचे स्थान ठरलेले नाही, कारण दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी तो खेळत आहे. पण रायुडूला मिळालेल्या संधीचे सोने करता आलेले नाही.
धवन सातत्य टिकवेल?
भारताची चिंता ही सलामीच्या जोडीपासूनच सुरू होते. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या असल्या तरी फटक्यांची निवड आणि धावांचे सातत्य याबाबत धवनच्या उणिवा नेहमीच समोर येत आहेत. राखीव सलामीवीर मुरली विजय ड्रेसिंग रूममध्ये आहे, तर उन्मुक्त चंद संधीच्या प्रतीक्षेत. त्यामुळे धवनने सलामीच्या स्थानाला योग्य न्याय द्यावा, अशी संघ व्यवस्थापनाची अपेक्षा आहे.
गोलंदाजांकडून सुधारणेची अपेक्षा
कोचीमध्ये भारताच्या गोलंदाजीच्या मर्यादासुद्धा स्पष्ट झाल्या. विंडीजच्या संघाने भारतीय गोलंदाजांची लक्तरे वेशीवर टांगताना ३२१ धावा केल्या. गेल्या वर्षभरात भारतीय भूमीवर दुसऱ्यांदा प्रतिस्पर्धी संघाने तीनशेहून अधिक धावा केल्या. यापैकी फिरकीपटूंनी २२ षटकांत १४२ धावा मोजल्या आणि त्याच महागात पडल्या. अनुकूल खेळपट्टय़ांवर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी आपली चुणूक दाखविण्याची नितांत आवश्यकता आहे. धोनीने पराभवाचे खापर आपल्या गोलंदाजांवर फोडले नाही. परंतु रवींद्र जडेजा आणि अमित मिश्रा यांची फिरकी प्रभावहीन होती. मोहम्मद शमीने चार बळी घेतले, परंतु शमी आणि मोहित शर्मा या गोलंदाजांना विंडीजच्या फलंदाजांनी चांगलाच चोप दिला. इशांत शर्माच्या पुनरागमनामुळे भारताचा गोलंदाजीचा मारा अधिक बलवान होईल, अशी अपेक्षा करू या. ‘चायनामॅन’ गोलंदाज कुलदीप यादवचा दुसऱ्या सामन्यात तरी धोनी वापर करतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
ब्राव्हो, सॅम्युअल्स, पोलार्डवर भिस्त
वेस्ट इंडिजच्या संघाची प्रामुख्याने अनुभवी खेळाडू ड्वेन ब्राव्हो, मार्लन सॅम्युअल्स आणि किरॉन पोलार्ड यांच्यावर मदार आहे. मानधनाच्या मुद्दय़ावर चालू असलेल्या वादाचा वेस्ट इंडिजच्या मैदानावरील कामगिरीवर कोणताही परिणाम होत नसल्याची ग्वाही पहिल्या सामन्यानेच दिली आहे. सॅम्युअल्स आणि दिनेश रामदिन यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. हाच विजयी आवेश कायम राखत मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.
एकत्रित संघ म्हणून आमची कामगिरी चांगली होते आहे. जिंकण्याची वृत्ती संघाने अंगीकारली आहे. ड्रेसिंग रुममध्ये क्लाइव्ह लॉइड, कर्टली अ‍ॅम्ब्रोज आणि रिची रिचर्डसन या दिग्गजांच्या उपस्थितीमुळे संघातले वातावरण सकारात्मक आहे. या त्रिकुटाचा अनुभव खेळाडूंसाठी उपयुक्त ठरत आहे. ख्रिस गेल आणि सुनील नरिन यांच्या अनुपस्थितीतही आम्ही दमदार सलामी दिली आहे. क्षमतेनुसार खेळ करत दुसरा सामनाही जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल.
-ड्वेन ब्राव्हो, वेस्ट इंडिजचा कर्णधार

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, मुरली विजय, कुलदीप यादव.
वेस्ट इंडिज : ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, जेसॉन होल्डर, लिऑन जॉन्सन, किरॉन पोलार्ड, दिनेश रामदिन, रवी रामपॉल, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, मार्लन सॅम्युअल्स, लेंडल सिमॉन्स, ड्वेन स्मिथ, जेरॉम टेलर.
*सामन्याची वेळ : दुपारी २.३० वा. पासून
*थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.