अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ७५ धावांची आघाडी मिळवली. इशांतने पाच बळी मिळवल्यामुळे विंडीजचा पहिला डाव २२२ धावांत संपुष्टात आला.

तत्पूर्वी, पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेने अर्धशतक साकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाचे (५८) अर्धशतक आणि इशांतने (१९) उपयुक्त योगदान दिल्यामुळे भारताचा पहिला डाव २९७ धावांवर संपुष्टात आला. जडेजा व इशांत यांनी आठव्या गडय़ासाठी ६० धावांची भागीदारी रचली.

त्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजांनी विंडीजवर वर्चस्व गाजवले. मोहम्मद शमीने जॉन कॅम्पबेलला (२३) माघारी पाठवून भारताला पहिले यश मिळवून दिले. जसप्रीत बुमरा, जडेजा आणि इशांत यांनीसुद्धा पहिल्या स्पेलमध्ये प्रत्येकी एकेक बळी पटकावल्यामुळे विंडीजची ४ बाद ८८ अशी अवस्था झाली.

रॉस्टन चेसने (४८) संयम बाळगून एकेरी-दुहेरी धावांवर भर देत विंडीजला सावरले. त्याने शाय होपसह पाचव्या गडय़ासाठी ४२, तर शिम्रॉन हेटमायरसह सहाव्या गडय़ासाठी ४४ धावांची भागीदारी रचली; परंतु इशांतचे दुसऱ्या स्पेलसाठी आगमन होताच विंडीजची फलंदाजी ढेपाळली.

इशांतने सर्वप्रथम चेसला चुकीचा फटका खेळण्यास भाग पाडले, तर होप (२४) आणि हेटमायर (३५) यांना तीन षटकांच्या अंतरात माघारी पाठवले. केमार रोचला शून्यावर बाद करून इशांतने कारकीर्दीत नवव्यांदा पाच बळी घेण्याची किमया साधली.

संक्षिप्त धावफलक