भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीचा धमाका पाहायला मिळाला. अनेक दिवसांपासून धोनीच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असताना धोनीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार खेळी करुन टिकाकारांना उत्तर दिले. वेस्ट इंडिजच्या सामन्यात त्याने ७९ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. धोनी आणि रहाणेच्या खेळीमुळे भारतीय संघाला २५० धावांचा टप्पा ओलांडता आला. या सामन्यात अझरुद्दीनपेक्षा अधिक धाव करण्याचा विक्रम रचणारा धोनी हा एकदिवसीयमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत षटकार ठोकले आहेत. भारताकडून २०० हून अधिक षटकार खेचणारा धोनी एकमेव खेळाडू आहे. यापूर्वी भाताकडून सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिनच्या नावावर होता. त्याने १९५ षटकार खेचले आहेत. आतंरराष्ट्रीय मैदानात खेळाडूंच्या यादीत शाहिद आफ्रिदिने सर्वाधिक ३५१ षटकारांसह अव्वल स्थानी असून  धोनी चौथ्या स्थानावर आहे.

भारतीय संघाच्या नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यापासून धोनी त्याच्या पूर्वीच्या अंदाजात खेळताना दिसत आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर धोनीने ५० पेक्षा अधिक सरासरीने धावा केल्या आहेत. सध्याच्या घडीला धोनीच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे. माजी क्रिकेटर राहुल द्रविड, सौरव गांगुली यांनी धोनीच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे वेस्ट इंडिज दौरा हा धोनीसाठी महत्त्वपूर्ण असाच असेल. शुक्रवारी रंगलेल्या सामन्यात आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर धोनीने भारतीय संघाचा डाव सावरला होता. रहाणेच्या साथीने त्याने भारतीय संघाला समाधानकारक धावसंख्या पर्यंत पोहोचवले. या खेळीत धोनीचा जुना अंदाज देखील पाहायला मिळाला.