भारताच्या मधल्या फळीतला भरवाशाचा फलंदाज महेंद्रसिंह धोनी केल्या काही सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्मात नाहीये. त्यातच आगामी विंडीज व ऑस्ट्रेलियातील टी-20 मालिकेसाठी धोनीला संघातून वगळण्यात आलंय. पहिल्या 3 वन-डे सामन्यांमध्येही धोनी फलंदाजीत आपली चमक दाखवू शकला नाही. या सर्व घडामोडी घडत असताना, सोमवारी होणाऱ्या चौथ्या वन-डे सामन्याआधी महेंद्रसिंह धोनीने नेट्समध्ये कसून सराव केला.

अवश्य वाचा – तुला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे! निवड समितीचा धोनीला सूचक इशारा

ऐच्छिक सरावाची मूभा असतानाही, धोनीने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉन स्टेडीयमवर तब्बल 45 मिनीटं फलंदाजी केली. यावेळी धोनीने भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांच्याशीही चर्चा केली. सध्या 5 सामन्यांच्या मालिकेत विंडीजने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. ब्रेबॉन स्टेडीयमवर भारत व विंडीज यांच्यातला चौथा सामना रंगणार आहे.

सरावादरम्यान सलामीवीर रोहित शर्मा, अंबाती रायडू, लोकेश राहुल, मनिष पांडे आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजा यांनीही नेट्समध्ये सराव केला. जाडेजाने नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचाही सराव केला. अखेरच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात जागा मिळालेल्या केदार जाधवलाही उद्या अंतिम 11 जणांच्या संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात धोनी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.

अवश्य वाचा – धोनीला संघातून वगळण्याचा निर्णय योग्यच !