वेस्ट इंडिज संघाच्या आगामी भारत दौऱ्यात कोची येथे खेळवल्या जाणाऱ्या प्रस्तावित वन-डे सामन्याचं ठिकाण आता बदलण्यात आलेलं आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनमधील एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला वन-डे सामना आता थिरुअनंतपूरमच्या मैदानात खेळवला जाणार आहे. यासंदर्भात बीसीसीआयकडून अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरीही येत्या काळात बीसीसीआय याबद्दलची अधिकृत घोषणा करेल.

कोचीतील जवाहरलाल आंतरराष्ट्रीय मैदान हे नुकत्याच पार पडलेल्या इंडियन सुपर लिग स्पर्धेत केरळ ब्लास्टर्स संघाचं घरचं मैदान होतं. भारतात पार पडलेल्या १७ वर्षाखालील विश्वचषकाचे अनेक सामने या मैदानावर खेळवण्यात आले होते. मात्र क्रिकेटचा सामना खेळवण्यासाठी कोचीचं मैदान पुर्णपणे खणण्याची गरज केरळ क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली होती. मात्र क्रिकेट सामन्यासाठी फुटबॉलचं मैदान नष्ट करण्यास अनेक मान्यवर व्यक्तींनी आक्षेप नोंदवला होता. काँग्रेस खासदार शशी थरुर, केरळ ब्लास्टर्स संघाचा सहमालक सचिन तेंडुलकर, फुटबॉलपटू सुनील छेत्री यांनी क्रिकेटसाठी फुटबॉलचं मैदान खणण्याला विरोध दर्शवला होता.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात विंडीजचा संघ २ कसोटी, ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दिवस-रात्र कसोटी सामनाही खेळणार आहे. हैदराबाद किंवा राजकोटला हा दिवस-रात्र सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे.