लोकेश राहुलच्या शतकाच्या जोरावर विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहचलेल्या भारतीय संघाचा पहिल्या टी-२० सामन्यात पराभव झाला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावा हव्या असताना ब्राव्होच्या गोलंदाजीवर धोनी झेल बाद झाल्यानंतर अमेरिकेच्या फ्लोरिडातील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क मैदानावर टी-२० क्रिकेटमधील विश्वविक्रमी विजयाची भारताची संधी हुकली. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार धोनीने वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली होती. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ६ बाद २४५ धावा केल्या होत्या. भारताला वेस्ट इंडिजने दिलेले आव्हान परतवता आले असते, तर टी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या धावसंख्ये पाठलाग करण्याचा विक्रम भारताच्या नावे झाला असता.  यापूर्वी वेस्ट इंडिजने आफ्रिकेविरुद्ध २३६ धावांचा पाठलाग करुन टी -२० क्रिकेटमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. टी-२० स्पर्धेत २६० ही सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने केनिया विरुद्धच्या सामन्यात ही धावसंख्या उभारली होती. वेस्ट इंडिजने दिलेल्या २४६ धावांचे आव्हान परतवून लावण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आघाडीचे फलंदाज परतल्यानंतर भारताच्या डावाला आकार देणारा रोहित शर्मा ६२ धावा करुन पोलार्डचा शिकार झाला. यापूर्वी वेस्ट इंडिज गोलंदाज आंद्रे रसेलने भारताला पहिला धक्का दिला. रसेलच्या गोलंदाजीवर ब्रावोने अजिंक्य राहणेचा सुरेख झेल टीपला. रहाणेने भारताच्या धावसंख्येत  एका चौकाराच्या मदतीने ७ धावांची भर घातली. त्यानंतर पाचव्या षटकात ब्राव्होने आपल्या गोलंदाजीवर भारताचा धमाकेदार फलंदाज विराट कोहलीला १६ धावांवर तंबूचा रस्ता दाखविला. सलामवीर रोहित शर्मा परतल्यानंतर लोकेश राहुलने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. मात्र, भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीने अखेरच्या चेंडूवर झेल बाद झाला. लोकेश राहुलने १२ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने नाबाद ११० धावांची खेळी केली. तर धोनीने २ चौकार आणि २ षटकार खेचत  २५ चेंडूत ४३ धावा करुन अडखळला. वेस्ट इंडिडकडून ९ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत १०० धावांची खेळी साकारणाऱ्या सलामवीर  ईव्हिन लेविसला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.