भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिका

हनुमा विहारीच्या पहिल्या शतकानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने हॅट्ट्रिक नोंदवण्याची किमया साधताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने सामन्यावरील पकड घट्ट केली आहे.

शनिवारी अखेरच्या सत्रात बुमराने टिच्चून गोलंदाजी करताना पहिल्या पाच फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. यात नवव्या षटकात त्याने डॅरेन ब्राव्हो, शामरा ब्रूक्स आणि रोस्टन चेस या तीन फलंदाजांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद बाद करून हॅट्ट्रिक साकारली. हा पराक्रम करणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला. ९.१-३-१६-६ असे बुमराच्या गोलंदाजीचे भेदक पृथक्करण होते. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या वेस्ट इंडिजची दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ८७ अशी केविलवाणी अवस्था झाली आहे.

बुमराने सातव्या षटकात जॉन कॅम्पबेलला ऋषभ पंतकरवी झेलबाद करून वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला. मग हॅट्ट्रिक साकारताना सर्वप्रथम ब्राव्होला दुसऱ्या स्लिपमध्ये लोकेश राहुलकडे झेल देण्यास बाद केले. मग ब्रूक्स आणि चेस यांना पुढील चेंडूंवर पायचीत केले. बुमराच्या हॅट्ट्रिकमध्ये कर्णधार विराट कोहलीलाही श्रेय द्यावे लागेल. चेसला मैदानावरील पंच पॉल रॅफेल यांनी नाबाद ठरवले होते. परंतु कोहलीने निर्णय पुनर्आढावा प्रक्रियेद्वारे (डीआरएस) दाद मागितली.

  • मोहम्मद शमीने शिम्रॉन हेटमायरचा (३४) त्रिफळा उडवला. मग दिवसातील अखेरच्या चेंडूवर बुमराने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरला बाद केले.
  • त्याआधी, भारताने पहिल्या डावात ४१६ धावा उभारताना विहारीने शतकी खेळी साकारली. त्याने २२५ चेंडूंत १६ चौकारांसह १११ धावा केल्या. त्याने इशांत शर्मा (८० चेंडूंत ५७ धावा) सोबत आठव्या गडय़ासाठी २८.३ षटकांत ११२ धावांची भागीदारी रचली. इशांतने कसोटी क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक नोंदवले.
  • कसोटी क्रिकेटमधील ४४वी हॅट्ट्रिक जसप्रीत बुमराने नोंदवली
  • हरभजन सिंगने २०११मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि इरफान पठाणने २००६मध्ये पाकिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवली आहे. त्यामुळे बुमराची हॅट्ट्रिक ही भारताच्या गोलंदाजाकडून साकारलेली तिसरी हॅट्ट्रिक ठरली.

हॅट्ट्रिकसाठी कर्णधाराचा ऋणी -बुमरा

कसोटी क्रिकेटमधील माझ्या हॅट्ट्रिकसाठी मी कर्णधार विराट कोहलीचा सदैव ऋणी राहीन, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराने व्यक्त केली. बुमराने सलग तिसऱ्या चेंडूवर रोस्टन चेस पायचीत असल्याचे अपिल केले. परंतु मैदानावरील पंच पॉल रॅफेल यांनी नाबाद असल्याचा कौल दिल्यानंतर विराटने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. ‘‘रोस्टनला बाद केल्याची मला खात्री नव्हती. चेंडू बॅटला लागल्याचे मला वाटल्याने मी दाद मागितली नाही. परंतु विराटने निर्णय पुनर्आढावा प्रक्रियेद्वारे दाद मागितली आणि रोस्टन बाद झाला. त्यामुळे विराटचा ऋणी राहीन.’’

पहिले शतक स्वर्गवासी वडिलांना समर्पित -विहारी

हनुमा विहारीने आपले पहिले कसोटी शतक आपल्या स्वर्गवासी वडिलांना समर्पित केले. याचप्रमाणे बहुमोल भागीदारी करताना समोरच्या बाजूने पाठबळ देणाऱ्या इशांत शर्माचे विहारीने आभार मानले. ‘‘मी १२ वर्षांचा असताना वडिलांचे निधन झाले. माझे पहिले आंतरराष्ट्रीय शतक वडिलांना समर्पित करीन, हे मी तेव्हाच ठरवले होते,’’ असे विहारीने सांगितले.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : १४०.१ षटकांत सर्व बाद ४१६ (हनुमा विहारी १११, विराट कोहली ७६; जेसन होल्डर ५/७७, रहकीम कॉर्नवॉल ३/१०५)’ वेस्ट इंडिज (पहिला डाव) : ३३ षटकांत ७ बाद ८७ (हेटमायर ३४; जसप्रित बुमरा ६/१६)