विश्वचषक स्पर्धेच्या ३४व्या सामन्यात भारताने विंडिजवर १२५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी आणखीन मजबूत केली तर दुसरीकडे पराभवामुळे विंडिज संघावर स्पर्धेबाहेर जाण्याची वेळ आली आहे. विश्वचषक स्पर्धेत विंडिज संघाचा हा पाचवा पराभव आहे. त्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टिकेचा अक्षरक्ष: वर्षाव होत आहे. दरम्यान माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू व क्रिकेट समीक्षक रमीज राजा यांनी धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलवर जोरदार टिका केली आहे.

चेंडू स्टेडिअमबाहेर टोलावण्यात पटाईत असलेल्या ख्रिस गेलला संपूर्ण क्रिकेट विश्व ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून ओळखते. परंतु हा कसला युनिव्हर्सल बॉस त्याची ही बॉसगिरी फक्त क्रिकेट लीग स्पर्धांपूरतीच मर्यादीत आहे. सपाट खेळपट्ट्या, लहान मैदाने व नवख्या गोलंदाजांसमोर ख्रिस गेल आपली बॅट गरगर फिरवतो. मात्र, विश्वचषक स्पर्धेत जेव्हा त्याच्यासमोर ‘जसप्रित बुमरा’, ‘मिचेल स्टार्क’, ‘जोफ्रा आर्चर’, ‘लसिथ मलिंगा’ यांसारखे दर्जेदार गोलंदाज येतात तेव्हा सुपरहिरो थॉरच्या हतोड्यासारखी चालणारी त्याची बॅट थंड पडते. ख्रिस गेल अगदी बेभरवशी फलंदाज आहे. त्याच्यातली अफाट क्षमता, जिद्द व महत्वकांक्षा केवळ तो क्रिकेट लीग स्पर्धांसाठीच राखून ठेवतो. गेलने आजवर तीन विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा विडिंज संघाला होणे अपेक्षित होते मात्र त्यातही तो अपयशी ठरला.

ख्रिग गेल व्यतिरिक्त त्यांनी विंडिज संघाच्या क्रिकेट प्रेमावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते विंडिज संघाने आजवर ‘विव रिचर्ड’, ‘गारफिल्ड सोबर्स’, ‘मॅलकम मार्शल’, ‘ब्रायन लारा’ यांसारखे अनेक दर्जेदार खेळाडू क्रिकेट विश्वाला दिले. या खेळाडूंचा खेळ इतका आक्रमक होता की ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांना जागेवरून हलण्याचीही परवानगी देत नसत. परंतू आताचे विंडिज खेळाडू पाहिले की त्यांच्या क्रिकेट प्रेमावरच शंका घ्यावीशी वाटते. अशा शब्दात रमीज राजा यांनी ख्रिस गेलसह विंडिज संघावर कडाडून टीका केली आहे.

विश्वचषक स्पर्धा सध्या अंतिंम टप्यात पोहचली असून गुणतालिकेवर नजर टाकल्यास विंडिजचा संघ सध्या फक्त तीन गुणांसह आठव्या स्थानावर आहे. विंडिज संघाला सात सामन्यात एक विजय मिळवता आला आहे तर एक सामना पावसाने धुतला गेल्यामुळे एक गुण मिळाला आहे. या विश्वचषकातील विंडिच्या संघाचे आव्हान संपल्यात जमा आहे. उर्वरीत दोन्ही सामन्यात विंडिज संघाने विजय मिळवला तरी त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता येणार नाही. त्यामुळे अखेरचे दोन्ही सामने जिंकून विंडिज संघ स्पर्धेचा शेवट गोड करणार का? हे पाहण्याजोगे ठरेल.