भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील राजकोट येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली आहे. पहिल्या दिवशी पृथ्वी शॉने झळकावलेल्या शतकानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही शतकी खेळीची नोंद केली आहे. कोहलीचं कसोटी कारकिर्दीतलं हे २४ वं तर कर्णधार या नात्याने १७ वं शतक ठरलं. दुसऱ्या दिवसाच्या खेळात विराटने भारतामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पाही ओलांडला आहे.

२०१८ सालातलं गेल्या १० कसोटींमधलं विराटचं हे चौथ शतक ठरलं आहे. याचसोबत यंदाच्या कॅलेंडर वर्षात विराटने एक हजार धावांचा टप्पाही ओलांडला आहे. याआधी विराटने इंग्लंड दौऱ्यात तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावामध्ये शतक झळकावलं होतं.

यादरम्यान विराटने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २४ वं शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन हे पहिल्या स्थानावर आहेत. ब्रॅडमन यांनी ६६ डावांमध्ये २४ व्या शतकाची नोंद केली होती, तर विराटला हा कारनामा करण्यासाठी १२३ डावांची गरज पडली. सचिन तेंडुलकरने १२५ डावांमध्ये २४ वं शतक झळकावलं होतं.

अवश्य वाचा – पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करेल – सौरव गांगुली