गुवाहटी वन-डे सामन्यात विंडीजने पहिल्यांदा फटकेबाजी करत 50 षटकात 322 धावांपर्यंत मजल मारली. मात्र भारताने विंडीजचं 323 धावांचं आव्हान सहज पूर्ण करत सामन्यात 8 विकेट राखून बाजी मारली. मात्र भारताची फलंदाजी पाहून विंडीजच्या जेसन होल्डरने आगतिक प्रतिक्रीया दिली आहे. भारतासारख्या संघाविरोधात खेळताना नेमकं किती धावसंख्येचं आव्हान द्यायचं हेच कळत नाही, होल्डरने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.

अवश्य वाचा – Ind vs WI : गुवाहटी वन-डे च्या पहिल्याच डावात 7 विक्रमांची नोंद, जाणून घ्या…

“भारताविरुद्ध खेळताना नेमकं किती धावांचं आव्हान द्यायचं हेच कळत नाही. सुरुवातीला 322 ही धावसंख्या आम्हाला भारताविरुद्ध योग्य वाटली होती. मात्र मध्यांतरापर्यंत भारतीय फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहता आम्ही काही 20-30 धावा कमी पडलो असं मला वाटलं.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत होल्डर बोलत होता.

कसोटी मालिकेच्या तुलनेत विंडीजच्या फलंदाजांनी पहिल्या वन-डे सामन्यात चांगली फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत हेटमायरने शतक झळकावलं. जेसन होल्डरनेही सामन्यात फटकेबाजी करत संघाला 300 चा टप्पा ओलांडून दिला. मात्र भारतीय फलंदाजांना वेसण घालण्याचं काम विंडीजचे गोलंदाज करु शकले नाही. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये विंडीजचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.