महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या फळीतल्या भारतीय संघाला झिम्बाब्वे दौऱ्यावर सूर गवसला आहे. आता हाच आवेश कायम राखत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासह मालिका जिंकण्याचा निर्धार भारताने केला आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रांतांमध्ये झिम्बाब्वेवर कुरघोडी केली. वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने २८ धावांत ४ बळी घेण्याची किमया साधली. त्यामुळे यजमानांचा डाव फक्त १६८ धावांत कोसळला. मग सलामीवीर लोकेश राहुलने पदार्पणातच साकारलेल्या शतकाच्या बळावर भारताने एक विकेटच्या मोबदल्यात झिम्बाब्वेचे लक्ष्य पार केले. अंबाती रायुडूनेही आपली भूमिका चोख पार पाडताना नाबाद ६२ धावा केल्या.

शनिवारच्या लढतीत भारताने शिस्तबद्ध गोलंदाजी केली. त्यामुळे पाचही गोलंदाजांच्या खात्यावर बळी होते. धवल कुलकर्णी आणि बरिंदर सरण यांनी प्रत्येकी दोन तर फिरकीपटू अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतला.

जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणारा मनीष पांडे संधीच्या प्रतीक्षेत आहे. आता धोनी याच विजयी संघासोबत खेळेल की दुसऱ्या सामन्यात जयंत यादव, फैझ फझल किंवा मनदीप सिंग यांना पदार्पणाची संधी देईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

झिम्बाब्वेच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. एल्टन चिगुंबुरावरच त्यांची मोठी मदार आहे. अँडी (२१३ सामने) व ग्रँट (२२१ सामने) या फ्लॉवर बंधूंनंतर दोनशे एकदिवसीय सामने खेळण्याचा पराक्रम चिगुंबुराने दाखवला आहे. सलामीच्या सामन्यातसुद्धा चिगुंबुराने सर्वाधिक ४१ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त वुसीमुझी सिबांडा, हॅमिल्टन मसाकाझा आणि चामू चिभाभा हे आणखी तीन अनुभवी खेळाडू संघात आहेत.

संघ

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), लोकेश राहुल, फैझ फझल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, केदार जाधव, मनदीप सिंग, रिशी धवन, जसप्रित बुमराह, जयंत यादव, युझवेंद्र चहल, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी, अक्षर पटेल, बरिंदर शरण.

झिम्बाब्वे : ग्रॅमी क्रिमर (कर्णधार), तेंडाई चटारा, चामू चिभाभा, एल्टन चिगुंबुरा, तेंडाई चिसोरो, क्रेग एव्‍‌र्हिन, नेव्हिले मॅडझिवहा, टिमीकेन मारूमा, हॅमिल्टन मसाकाझा, वेलिंग्टन मसाकाझा, पीटर मूर, ट्वानाडा मुपारिवा, रिचर्ड मुतुम्बामी, तौराई मुझाराबानी, वुसीमुझी सिबांडा, सिकंदर रझा, डोनाल्ट तिरिपानो, सीन विल्यम्स.

*  सामन्याची वेळ : दु. १२.३० वा.
* थेट प्रक्षेपण : टेन ३ वाहिनीवर.