एकदिवसीय मालिकेत ३-० अशा दणदणीत विजयानंतर भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतही ‘अजिंक्य’ राहणे मोहीम राबवण्याची संधी असेल. पहिल्या ट्वेंटी-२० लढतीत सहज विजय मिळवल्यानंतर हतबल यजमानांना दुसऱ्या सामन्यातही पराभूत करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ रविवारी येथील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर उतरणार आहे.
एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या लढतीत लढाऊ वृत्तीचा नजराणा सादर करणाऱ्या झिम्बाब्वेला त्यानंतर सातत्य राखण्यात अपयश आले. रविवारी आपली लाज वाचवण्याची शेवटची संधी त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे सांघिक खेळ करून घरच्या प्रेक्षकांसमोर विजय मिळवण्यासाठी तेही प्रयत्नशील असतील.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली दाखल झालेला भारतीय संघ कागदावर दुय्यम वाटत असला तरी झिम्बाब्वेच्या तुलनेत तो वरचढच आहे. भारताच्या प्रत्येक खेळाडूने आतापर्यंत आपापल्या परीने योगदान दिले आहे. एकदिवसीय मालिकेत सामनावीराचा किताब पटकावणारा अंबाती रायडू दुखापत झाल्यामुळे मनीष पांडेला संधी मिळाली. तिसऱ्या सामन्यात ७१ धावा चोपून त्याने त्याची निवड योग्य ठरवली. संघात नवे चेहरे असले तरी आयपीएलमुळे त्यांच्याकडे पुरेसा अनुभव आहे. कर्णधार रहाणे आणि मुरली विजय यांच्यावर सलामीची जबाबदारी असेल, मधल्या फळीत रॉबिन उथप्पा चोख कामगिरी बजावण्यास सक्षम आहे. त्याच्या सोबतीला मनीष पांडे व केदार जाधव यांची बॅट तळपल्यास भारताला मोठा पल्ला गाठणे सहजशक्य आहे. गोलंदाजीत अनुभवी हरभजन सिंग आणि अक्षर पटेल यांनी छाप पाडली आहे. भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा यांनीही आपली भूमिका चोख बचावली आहे. दुसरीकडे यजमान अनुभवी फलंदाज हॅमिल्टन मसकाटझा, इल्टॉन चिंगबुरा आणि चामू चिभाभा यांच्यावरच विसंबून आहेत.

वेळ : दुपारी ४.३० वा. पासून;
थेट प्रक्षेपण : टेन क्रिकेट वाहिनीवर.