फॉम्र्युला-वनचे सर्वेसर्वा बर्नी एस्सेलस्टोन आणि इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीच्या संयोजकांमधील बोलणी फलदायी ठरल्यामुळे आता २०१६ मध्ये भारतात पुन्हा फॉम्र्युला-वन शर्यतीचा थरार रंगणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. शर्यतीचे संयोजक जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनलने आता या शर्यतीच्या आगमनासाठी बुद्ध इंटरनॅशनल सर्किट सज्ज ठेवण्याची सुरुवात केली आहे.
सोची येथे झालेल्या रशियन ग्रां. प्रि. शर्यतीच्या आधी जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनलचे प्रमुख समीर गौर आणि एस्सेलस्टोन यांच्यात बैठक झाली होती. तीन वर्षे फॉम्र्युला-वनचा थरार चाहत्यांनी लुटल्यानंतर २०१४च्या वेळापत्रकातून इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीला डच्चू देण्यात आला होता. करसवलत न मिळणे, व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच चाहत्यांची रोडावलेली संख्या या सर्व गोष्टी त्याला कारणीभूत ठरल्या होत्या. २०१५च्या वेळापत्रकातही भारतातील शर्यतीला स्थान देण्यात आलेले नाही.
‘‘समीर गौर यांच्यासोबत माझी यशस्वी बोलणी झाली. दरम्यानच्या काळात करसवलत आणि अन्य अडचणींवर तोडगा काढल्यास, भारतात फॉम्र्युला-वनची शर्यत आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मी त्यांना दिले. २०१५च्या फॉम्र्युला-वनच्या वेळापत्रकात भारताला स्थान मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे आम्ही २०१६मध्ये भारतात परतण्याचा प्रयत्न करू,’’ असे एस्सेलस्टोन यांनी सांगितले.