News Flash

भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका : आज वर्चस्वासाठी लढाई

आतापर्यंतच्या दोन सामन्यांत ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि खराब गोलंदाजी हे घटक भारतासाठी चिंतेचे ठरले आहेत.

 

|| प्रशांत केणी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीत सुधारणा आवश्यक :- कर्णधार विराट कोहलीने पाठलागाचे यशस्वी तंत्र राबवत हैदराबादला विजयाध्याय लिहिल्यानंतर तिरुवनंतपूरमला वेस्ट इंडिजच्या सामर्थ्यवान फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजांनी बाजी मारत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर बुधवारी होणारा तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील तिसरा सामना हा निर्णायक ठरणार आहे. आतापर्यंतच्या दोन सामन्यांत ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि खराब गोलंदाजी हे घटक भारतासाठी चिंतेचे ठरले आहेत.

क्षेत्ररक्षणात ढिसाळपणा असल्यास कितीही मोठी धावसंख्या अपुरी ठरते, असे दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने म्हटले होते. भुवनेश्वर कुमारच्या षटकातील लागोपाठच्या चेंडूंवर अनुक्रमे वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंतने दिलेली जीवदाने विंडीजच्या पथ्यावर पडली. यावेळी दोन फलंदाज बाद झाले असते, तर विंडीजवरील दडपण वाढले असते. याचप्रमाणे भारतीय फलंदाजांनी अखेरच्या हाणामारीच्या षटकांत फक्त ३० धावा केल्या, याकडेही कोहलीने लक्ष वेधले.

चालू मालिकेत भारताच्या फलंदाजीची समस्या नाही. पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेला सलामीवीर रोहित शर्मा वानखेडेवर घरच्या क्रीडारसिकांच्या साक्षीने दिमाखदार खेळी साकारण्यासाठी उत्सुक आहे. कोणत्याही मैदानावर षटकार खेचण्याची क्षमता माझ्याकडे आहे, असा दावा तिरुवनंतपूरमला लक्षवेधी अर्धशतक साकारणाऱ्या मुंबईकर शिवम दुबेने केला आहे. श्रेयस अय्यरसाठीसुद्धा वानखेडे अनुकूल ठरू शकेल.

पंतला स्थान टिकवण्याचे आव्हान

यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. महेद्रसिंह धोनीच्या स्थानावर कडवी दावेदारी करणाऱ्या पंतला आता संघातील स्थान टिकवणे कठीण झाले आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीवर उतरणाऱ्या पंतने गेल्या सामन्यांत नाबाद ३३, १८, ६, २७, १९, ४ अशा धावा केल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात प्रोव्हिडेन्स येथे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने अखेरचे अर्धशतक साकारले होते. या पाश्र्वभूमीवर राखीव खेळाडूंमध्ये प्रतीक्षा करणाऱ्या संजू सॅमसनलाही संधी मिळू शकते.

सुंदरचे स्थान धोक्यात

फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरचे संघातील स्थानसुद्धा धोक्यात आहे. सुंदरने गेल्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांत तीन बळी (विंडीजविरुद्ध दोन आणि बांगलादेशविरुद्ध एक) मिळवले आहेत. याचप्रमाणे त्याने २३ षटकांत १४४ धावा दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत त्याला एकही बळी मिळाला नव्हता. दुसऱ्या सामन्यात सुंदरने लेंडल सिमन्सचा महत्त्वाचा झेल सोडला होता. त्यामुळे सुंदरच्या जागी ‘चायनामॅन’ कुलदीप यादवला स्थान मिळण्याची शक्यता आहे. कुलदीपने फेब्रुवारी महिन्यात हॅमिल्टन येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आता विंडीजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत त्याला संधी मिळालेली नाही.

सिमन्स, हेटमायर, लेविसवर विंडीजची मदार

दुसरा सामना जिंकून दिमाखदार पुनरागमन करणाऱ्या विंडीजनेही मालिका जिंकण्यासाठी कसून तयारी केली आहे. २०१६ मध्ये       वानखेडेवरच उपांत्य सामन्यात भारताला नमवून विंडीजने ट्वेन्टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठून मग जेतेपद पटकावले होते. आघाडीवीर फलंदाज लेंडल सिमन्स, एव्हिन लेविस, निकोलस पूरन आणि शिम्रॉन हेटमायर ट्वेन्टी-२० क्रिकेटला साजेशी फलंदाजी करीत आहे. शिवाय ब्रँडन किंग, जेसन होल्डर आणि कर्णधार किरॉन पोलार्ड यांच्यासारखे मातब्बर खेळाडू त्यांच्याकडे आहेत. वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रिएल टिच्चून मारा करीत आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून न सावरल्याने अष्टपैलू फॅबियन ऑलीन तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे, असे संकेत सिमन्स याने दिले आहेत.

आता कशाला उद्याची बात? – रोहित

ट्वेन्टी-२० विश्वचषकाला अद्याप बराच अवधी आहे. सध्या तरी एकेक सामने आणि मालिका जिंकण्याकडे लक्ष केंद्रित करू, असे उपकर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले. ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने आम्ही संघबांधणी करीत आहोत, असे मी अजिबात सांगणार नाही. कारण या स्पर्धेला बराच वेळ आहे. जर आम्ही सामने जिंकत राहिलो, मैदानावर योग्य रणनीती आखत राहिलो, तर संघबांधणी आपोआपच साधली जाईल,’’ असे रोहितने सांगितले.

चुकीला माफी नाही! -सिमन्स

पहिल्या दोन्ही सामन्यांत दोन्ही संघांमधील खेळाडूंनी अनेक झेल सोडले. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी ‘चुकीला माफी नाही’ असाच पवित्रा घेतला. ‘‘झेल सुटले की, विजय दुरावतो. मग खेळाडू सांगतात की, प्रकाश आला, क्षेत्ररक्षणाच्या स्थानाविषयी गोंधळ झाला. पण मला ही कारणे अजिबात पटत नाहीत. तुम्ही झेल सोडलात, तर ती पूर्णत: तुमची चूक आहे. त्यामुळे अधिकाधिक मेहनत करीत राहिल्यास अशा चुका होणार नाहीत,’’ असे सिमन्स यांनी सांगितले. ‘‘कर्णधार किरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाचे ‘आयपीएल’मध्ये प्रतिनिधित्व करीत असल्याने वानखेडेवर खेळण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. हाच अनुभव तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे सिमन्स म्हणाले.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, संजू सॅमसन.

वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऑलीन, ब्रँडन किंग, दिनेश रामदिन, शेल्डन कॉट्रिएल, एव्हिन लेविस, शेर्फानी रुदरफोर्ड, शिम्रॉन हेटमायर, ख्ॉरी पीएरी, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनिअर, कीमो पॉल, केसरिक विल्यम्स.

सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून ल्लथेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 12:55 am

Web Title: india west indies cricket series akp 94
Next Stories
1 ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाचे पारडे जड
2 ..तर धोनी विश्वचषकात  नक्कीच खेळेल!
3 पाकिस्तान-श्रीलंका कसोटी मालिका : पाकिस्तानची ‘कसोटी’
Just Now!
X