भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका

चेन्नईच्या पहिल्या सामन्यात चीतपट झाल्यानंतर विशाखापट्टमणला भारताची विजयपर्वणी क्रिकेटरसिकांना अनुभवता आली. आता कटकला तिसरी आणि अखेरची लढत जिंकून वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. कॅरेबियन संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील हा सलग १०वा मालिका विजय ठरणार आहे.

विशाखापट्टणमप्रमाणेच बाराबती स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरेल. दोन वर्षांपूर्वी या मैदानावर भारताने ३८२ धावा उभारत इंग्लंडला १५ धावांनी नमवले होते. त्यामुळे बाराबतीमध्येही धावावर्षांव अपेक्षित आहे.

चेन्नईत विंडीजने आश्चर्यकारक कामगिरी बजावत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण या धक्क्यातून सावरत भारताने दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन केले. विशाखापट्टणमला कर्णधार विराट कोहली बऱ्याच वर्षांनी शून्यावर बाद झाला. पण भारताच्या आघाडीच्या फळीने विंडीजच्या गोलंदाजांवर जोरदार आक्रमण करीत ३८७ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर कुलदीप यादवने हॅट्ट्रिक साजरी करताना विंडीजच्या फलंदाजांना शरणागती पत्करायला लावली. त्यामुळे भारताने १०७ धावांनी शानदार विजय मिळवला. भारताने मायदेशातील अखेरच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून २-३ अशा फरकाने हार पत्करली होती. त्यामुळे भारतीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कोहलीला आकडेवारी सुधारण्याची संधी

कोहलीला बाराबती स्टेडियमवरील आकडेवारी सुधारण्याची संधी विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात मिळणार आहे. कोहलीने येथे झालेल्या ४ सामन्यांत (३ एकदिवसीय आणि १ ट्वेन्टी-२०) फक्त ३४ धावा केल्या आहेत. या मालिकेत कोहलीने अनुक्रमे ४ आणि ० धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या एकदिवसीय लढतीत कोहली तब्बल सहा वर्षांनतर प्रथमच पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यापूर्वी २०१३मध्ये धरमशालाला इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.

ढिसाळ क्षेत्ररक्षण चिंताजनक

भारताच्या फलंदाजीच्या आणि गोलंदाजीच्या सामर्थ्यांपुढे ढिसाळ क्षेत्ररक्षण मात्र अडचणीचे ठरत आहे. दुसऱ्या सामन्यात दीपक चहरने निकोलस पूरन आणि शाय होप यांचे झेल सोडले. त्या वेळी कोहलीच्या भुवया उंचावल्या होत्या. निर्णायक लढतीत क्षेत्ररक्षण सुधारण्याचे आव्हान भारतापुढे असेल. ‘‘आम्ही क्षेत्ररक्षणाच्या विभागातील चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. क्षेत्ररक्षणाचा आनंद लुटणे महत्त्वाचे असते,’’ असे कोहलीने म्हटले आहे.

जबाबदारीची जाणीव झाल्यामुळेच कामगिरीत सातत्य -श्रेयस

कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात मी फक्त एकाच प्रकारे फलंदाजी करण्यावर भर द्यायचो, मात्र वेळेनुसार जबाबदारीची जाणीव झाल्यामुळे माझी कामगिरी सुधारली, अशी प्रतिक्रिया भारताचा उदयोन्मुख फलंदाज श्रेयस अय्यरने व्यक्त केली. मुंबईच्या २५ वर्षीय श्रेयसने गेल्या चारही एकदिवसीय सामन्यांत अर्धशतके झळकावली असून विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या लढतीतही संघाच्या विजयात मोलाचे योगदान देण्यासाठी तो उत्सुक आहे. ‘‘स्थानिक क्रिकेटची मी ज्यावेळी सुरुवात केली. तेव्हा कधीही जबाबदारीने फलंदाजी केली नाही. संघाची परिस्थिती अथवा खेळपट्टी कशीही असो, मी फक्त एकाच प्रकारे फलंदाजी करायचो. मात्र वेळेनुसार माझ्यावरील जबाबदारीची मला जाणीव झाल्याने माझ्या कामगिरीत सातत्य आले,’’ असे श्रेयस म्हणाला.

रोहित-राहुलची समर्थ सलामी

विशाखापट्टणमला १५९ धावांची वादळी खेळी साकारणारा रोहित शर्मा सनथ जयसूर्याचा २२ वष्रे जुना विक्रम मोडण्यापासून नऊ धावांच्या अंतरावर आहे. लोकेश राहुलनेही शतकी खेळी उभारत रोहितच्या साथीने २२० धावांची सलामी देताना सलामीवीराची दावेदारी अधिक मजबूत केली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील जूनमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यापासून तो समर्थपणे सलामी देत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतही त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनीही फटकेबाजी करीत आपले स्थान बळकट केले आहे. तिसऱ्या सामन्यातून वेगवान गोलंदाज दीपक चहरने दुखापतीमुळे माघार घेतल्याने दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी त्याची जागा घेणार आहे.

हेटमायर-होपवर विंडीजची भिस्त

वेस्ट इंडिजच्या फलंदाजीची भिस्त हेटमायर-होप या डाव्या-उजव्या जोडीवर असेल. चेन्नईत या दोघांच्या आक्रमक फलंदाजीमुळेच भारताला पराभव पत्करावा लागला. विशाखापट्टणमला अय्यरच्या अचूक फेकीमुळे शिम्रॉन हेटमायरला धावचीत होऊन माघारी परतावे लागले. अन्यथा तो भारतीय गोलंदाजांवर भारी पडला असता. चेन्नईत १३९ धावांची खेळी साकारणाऱ्या हेटमायरला नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लिलावात दिल्ली कॅपिटल्सने ७ कोटी ७५ लाखांची बोली लावली होती. यंदाच्या वर्षांतील धावांच्या आकडेवारीत रोहितनंतर दुसऱ्या स्थानावर असलेल्या यष्टीरक्षक-फलंदाज होपला मात्र लिलावात कुणीच खरेदी केले नाही. किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखालील विंडीजच्या संघाने दोन्ही सामन्यांत नाणेफेक जिंकून पाठलाग करणे पसंत केले. मात्र तिसऱ्या सामन्यात दवाच्या घटकाचा गांभीर्याने विचार करून पोलार्डला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने ८ कोटी ५० लाख रुपये बोली लावलेल्या शेल्टन कॉट्रिएलचा आत्मविश्वाससुद्धा दुणावला आहे.

१०

२००६मध्ये वेस्ट इंडिजने मायदेशात भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर १३ वर्षांत भारताने सलग नऊ मालिका जिंकून आता १०व्या मालिकाविजयाच्या उंबरठय़ावर आहे.

१९९७मध्ये सनथ जयसूर्याने सलामीवीर म्हणून सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकूण २३८७ धावा केल्या होत्या. सलामीवीर रोहितने २०१९मध्ये २३७९ धावा केल्या असून, जयसूर्याच्या विक्रमापासून तो ९ धावांच्या अंतरावर आहे.

बाराबती स्टेडियमवर गेल्या १५ वर्षांत झालेले सहाही सामने भारताने जिंकले आहेत.

कुलदीपने ५५ एकदिवसीय सामन्यांत ९९ बळी घेतले असून, शतकापासून तो एका बळीच्या अंतरावर आहे.

११९

रोहितला एकदिवसीय क्रिकेटमध्ये नऊ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी ११९ धावांची आवश्यकता आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयंक अगरवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील अ‍ॅम्ब्रिस, शाय होप, ख्ॉरी पीएरी, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रिएल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिम्रॉन हेटमायर, एव्हिन लेविस, रोमारिओ शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल, हेडन वॉल्श.

* सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून. ’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी.