भारतीय क्रिकेट संघ आज वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा बरोबरचे मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले आहे. मी सुद्धा बातम्यांमधून रोहित शर्मा बरोबर माझे मतभेद झाल्याचे ऐकले आहे. यशस्वी होण्यासाठी ड्रेसिंग रुममधले वातावरण खूप महत्वाचे असते. रोहित बरोबर मतभेदाचे वृत्त खरे असते तर आम्ही चांगली कामगिरी करु शकलो नसतो असे विराटने उत्तर दिले.

ड्रेसिंग रुममधले वातावरण खराब असते तर संघाला इतका चांगला खेळ करता आला नसता असे विराट म्हणाला. जर मला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर ते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसले असते. मी नेहमीच रोहितचे कौतुक केले आहे. या अशा अफवा पसरवून कोणाला फायदा होणार ते माहित नाही असे विराट म्हणाला.

आम्ही गेली चार वर्ष संघाला सातव्या स्थानावरुन पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी मेहनत केली. अशा बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही. तुम्ही ड्रेसिंगरुममध्ये येऊन एकदा बघा. कसे वातावरण असते ते असे विराट म्हणाला.

संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुद्धा रोहित आणि विराटमध्ये मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले. खेळापेक्षा कोणीही व्यक्ती मोठी नाही. मी, विराट किंवा संघामध्ये कोणीही मोठे नाही. संघाच्या हिताच्या दृष्टीनेच त्यांनी खेळ केला. संघात मतभेद असतील तर तुम्हाला सर्व फॉरमॅटमध्ये तुम्हाला सातत्य राखता येत नाही. मी ड्रेसिंग रुमचा भाग होतो आणि तिथे असा काही मुर्खपणा नव्हता असे रवी शास्त्री म्हणाले.
.