भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका आजपासून सुरू
पीटीआय, लॉडेरहिल (अमेरिका)
विश्वचषक पटकावण्याचे स्वप्न अधुरे राहिल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आता या धक्क्यातून सावरून नव्या अध्यायाची सुरुवात करावी लागणार आहे. शनिवारपासून फ्लोरिडा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेद्वारे पुन्हा एकदा विजयपथावर येण्याची संधी भारतीय संघाला मिळणार आहे.
२०२० मध्ये रंगणाऱ्या विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेला अवघे १५ महिने शिल्लक राहिले असताना भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाचा प्रश्न तसेच महेंद्रसिंह धोनीची भविष्यातील निवृत्ती या सर्वावर तोडगा काढावा लागणार आहे. नव्या खेळाडूंना संधी देण्यावर आपण भर देणार असल्याचे कोहलीने या दौऱ्यासाठी रवाना होण्याआधीच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. कोहलीला या दौऱ्यासाठी विश्रांती देणार असल्याची चर्चा होती; पण निवड समितीने जसप्रीत बुमराचा अपवाद वगळता पूर्ण क्षमतेचा संघ निवडला आहे. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला संपूर्ण दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.
श्रेयस, मनीष पांडेवर नजरा
मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर यांना एकदिवसीय विश्वचषकाच्या योजनेतून वगळण्यात आले होते. मात्र भारताला आपली मधली फळी भक्कम करायची असेल तर या दोघांना संधी द्यावी लागणार आहे. पांडे नोव्हेंबर २०१८ मध्ये तर श्रेयस फेब्रुवारी २०१८ मध्ये भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. नुकत्याच झालेल्या कॅरेबियन दौऱ्यात श्रेयस आणि मनीषने अप्रतिम कामगिरी करत छाप पाडली होती. त्याचबरोबर
अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर, वेगवान गोलंदाज खलिल अहमद आणि दीपक चहर, नवदीप सैनी तसेच फिरकीपटू राहुल चहर यांनी ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळवले आहे.
पोलार्ड, नरिनचे पुनरागमन
ट्वेन्टी-२० प्रकारात नेहमीच चांगली कामगिरी करणाऱ्या वेस्ट इंडिजवर अधिराज्य गाजवणे भारताला जमलेले नाही. त्यातच धोकादायक किरॉन पोलार्ड आणि फिरकीपटू सुनील नरिनच्या पुनरागमनामुळे वेस्ट इंडिजची बाजू मजबूत झाली आहे. आंद्रे रसेल जायबंदी असला तरी त्याचा वेस्ट इंडिजच्या संघात समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू कालरेस ब्रेथवेट विंडीजचे नेतृत्व सांभाळत असून इविन लुइस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन यांच्यावर विंडीजची फलंदाजी अवलंबून आहे. कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या ख्रिस गेलला ट्वेन्टी-२० मालिकेसाठी स्थान देण्यात आले नसले तरी त्याचा एकदिवसीय मालिकेसाठी समावेश करण्यात आला आहे.
रोहितसह सलामीला कोण?
रोहित शर्मासह सलामीला लोकेश राहुल आणि शिखर धवन यांच्यापैकी कोण उतरणार, याचा फैसला भारतीय संघ व्यवस्थापनाला करावा लागणार आहे. गेल्या काही सामन्यांपासून धवनच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास, त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. मात्र धवनच्या अनुपस्थितीत सलामीला चांगली कामगिरी करणाऱ्या राहुलकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रोहितने विश्वचषकात पाच शतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता, त्यामुळे त्याच्या कामगिरीत सातत्य राहील, अशीच अपेक्षा भारताला आहे.
रोहितला गेलचा विक्रम मोडण्याची संधी
भारताचा तडाखेबंद फलंदाज रोहित शर्माला ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा ख्रिस गेलच्या नावावर असलेला विक्रम मोडण्याची संधी आहे. शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहितला हा विक्रम मागे टाकण्यासाठी चार षटकारांची आवश्यकता आहे. गेलने ५८ सामन्यांत १०५ षटकार ठोकले असून रोहितने ९४ सामन्यांत १०२ षटकारांची आतषबाजी केली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रोहितच्या नावावर असून त्याने २,३३१ धावा केल्या आहेत.
संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, कृणाल पंडय़ा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.
ल्ल वेस्ट इंडिज : कालरेस ब्रेथवेट (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, इविन लुइस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, कीमो पॉल, सुनील नरिन, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, अँथनी ब्रॅम्बल, आंद्रे रसेल, खारी पाएरे.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, सोनी टेन ३ (दोन्ही एचडी वाहिन्या)
५
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या ११ सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी ५ सामने जिंकले आहेत. मायदेशात झालेल्या पाच सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर ३-१ अशी सरशी साधली असून एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
४४
सर्वप्रकारच्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पाच हजार धावा आणि २५० बळींचा टप्पा गाठणारा वेस्ट इंडिजचा तिसरा क्रिकेटपटू बनण्यासाठी आंद्रे रसेलला ४४ धावांची आवश्यकता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2019 3:46 am