भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिका

अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतके झळकावत केलेल्या १११ धावांच्या नाबाद भागीदारीमुळे भारताने वेस्ट इंडिजपुढे कसोटी विजयासाठी आव्हानात्मक लक्ष्य समोर ठेवले आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजची दुसऱ्या डावात २ बाद ४५ अशी केविलवाणी अवस्था झाल्यामुळे उर्वरित आठ फलंदाजांना ४६८ धावांचे अशक्यप्राय आव्हान पेलावे लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसह मालिकेतील निर्भेळ यश भारताच्या दृष्टिपथात आहे.

दुसऱ्या डावात भारताचे पहिले चार फलंदाज ५७ धावांत गारद झाल्यानंतर रहाणे (नाबाद ६४) आणि विहारी (नाबाद ५३) यांनी डाव सावरला. पाचव्या गडय़ासाठी या दोघांनी साकारलेल्या भागीदारीमुळे भारताला ४ बाद १६८ अशा समाधानकारक धावसंख्येवर डाव घोषित करता आला. मग उर्वरित १३ षटकांच्या खेळात वेस्ट इंडिजची त्रेधातिरपीट उडाली. कार्लोस ब्रेथवेटला (३) इशांत शर्माने बाद केले, तर जॉन कॅम्पबेलला (१६) मोहम्मद शमीने तंबूची वाट दाखवली.

वेस्ट इंडिजचा पहिला डाव गुंडाळून २९९ धावांची आघाडी घेतल्यानंतरही भारताने फॉलोऑन देण्याचे टाळले. परंतु विंडीजच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करताना भारताची ३७ षटकांत ४ बाद ७३ धावा अशी अवस्था केली. परंतु रविवारी अखेरच्या सत्रात रहाणे आणि विहारीने दिमाखदार फलंदाजी केली. रहाणेने १०९ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह आपली खेळी साकारली, तर विहारीने ७६ चेंडूंत उभारलेल्या खेळीत आठ चौकार मारले.

संक्षिप्त धावफलक

* भारत (पहिला डाव) : ४१६

* वेस्ट इंडिज (पहिला डाव) : ११७

* भारत (दुसरा डाव) : ५४.४ षटकांत ४ बाद १६८ डाव घोषित (अजिंक्य रहाणे नाबाद ६४, हनुमा विहारी नाबाद ५३; केमार रोच ३/२८)

* वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : १३ षटकांत २ बाद ४५ (डॅरेन ब्राव्हो खेळत आहे १८; मोहम्मद शमी १/१२)