केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना विश्वास; आतापासूनच गुणवान खेळाडूंच्या शोधमोहिमेला सुरुवात

नवी दिल्ली : लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या २०२८ मधील ऑलिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत अव्वल १० जणांमध्ये स्थान पटकावेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला आहे.

‘‘ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंना यश मिळण्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ‘लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ’ ही कनिष्ठ खेळाडूंसाठी असणारी योजना लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या तयारीच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहे. या योजनेतून १० आणि १२ वर्षांच्या गुणवान मुलांना हेरण्यात येणार आहे. भारताला क्रीडाक्षेत्रात महासत्ता बनवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न सफल झाल्यास २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत अव्वल १०मध्ये असेल,’’ असे रिजिजू यांनी म्हटले.

‘‘कनिष्ठ खेळाडूंसाठी असणाऱ्या योजनेमुळे कुमार-कुमारी पातळीवरील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना दर्जेदार प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. जेणेकरून लॉस एंजेलिस येथील ऑलिम्पिकमध्ये नाव उंचावण्यासाठी खेळाडू सज्ज होतील. नुकतीच भारतीय प्रशिक्षकांवरील दोन लाख रुपये पगाराची मर्यादादेखील दूर करण्याचा निर्णय घेतला होता. चांगले प्रशिक्षक मिळण्यासाठीच हा निर्णय घेतला,’’ असे रिजिजू यांनी म्हटले.

ऑलिम्पिकमध्ये कणखरता महत्त्वाची -रीड

नवी दिल्ली : क्रीडा जगतात ऑलिम्पिक ही सर्वात कठीण स्पर्धा आहे त्यामुळे त्या स्पर्धेत खेळताना कणखरता महत्त्वाची आहे, असे भारताच्या पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी म्हटले. ‘‘क्रीडाक्षेत्रात ऑलिम्पिक ही कठीण स्पर्धा आहे. यास्थितीत खेळाडूंनाही त्या तोडीने मनोबल उंचावणे गरजेचे आहे. ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच लढतीत खेळताना भावनांवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. मात्र त्या भावनांवर ज्यांना नियंत्रण मिळवता येते, ते खेळाडू यशस्वी होतात. पुढील १२ महिने हॉकी संघाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल,’’ असे रीड यांनी सांगितले.